कणकवली येथील सात फ्लॅट चोरट्यांनी फोडून सोन्याचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारत १४ तोळे सोने लंपास केल्याचे सकाळी उघडकीस आले. पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली.
कणकवली तालुक्यातील जानवली येथील दीक्षा अपार्टमेंट आणि पीजी ग्रुप या दोन इमारतींमध्ये शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आली आहे. दोन्ही इमारतींमध्ये एकूण सात फ्लॅट चोरांनी फोडले. यात सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला.
गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा फायदा चोरट्याने उठवला. घटनेची माहिती समजताच शुक्रवारी सकाळी कणकवली पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असून नजीकच्या ब्रह्माकुमारी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सीसीटीव्हीवरून मध्यरात्रीच्या समारास दोन चोरटे या रस्त्यावरून जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे रामचंद्र शेळके व अन्य पोलिसांकडून सुरू आहे.
तब्बल १४ तोळे दागिने लांबविले
कणकवलीतील एस एम हायस्कूलमध्ये कार्यरत असलेले शिक्षक विजय सातपुते यांच्या मालकीच्या फ्लॅटमधील तब्बल १४ तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे चोरी झालेल्या फ्लॅटच्या बाजूच्या फ्लॅटमध्ये सातपुते हे राहत होते. त्या ठिकाणी त्यांचे दोन फ्लॅट असून त्यांच्या बंद फ्लॅटमध्ये असलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.