Sindhudurg Malvan coast Tourist boat sink : सिंधुदुर्गतील मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटकांची बोट बुडाली आहे. या दुर्घटनेमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यापैकी १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून दोघांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: श्वासांसाठी धडपड, आरडाओरड अन् धावपळ…; तारकर्ली बोट दुर्घटनेनंतरचे धक्कादायक फोटो
बोट बुडत असल्याचं दिसताच स्थानिकांनी तसेच किनाऱ्यावर तैनात असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरु केलं. स्कुबा डायव्हिंगवरुन परतत असतानाच या बोटीचा अपघात घडला. बोटीमधील सर्व पर्यटक मुंबई आणि पुण्याचे असल्याचे समजते.
जय गजनान नवाच्या बोटीचा स्कुबा डायव्हिंगवरुन समुद्रकिनाऱ्याकडे परतताना आज दुपारी एमटीडीसी रिसॉर्टजवळ अपघात झाला. या अपघातानंतर बोट बुडू लागली असताना किनाऱ्यावरील स्थानिकांबरोबरच तेथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील कर्मचारी तातडीने हलचाल करुन बोट बुडत असणाऱ्या ठिकाणी बोटींच्या मदतीने पोहोचले.
नक्की वाचा >> तारकर्ली बोट दुर्घटना : मृतांची ओळख पटली, मृतांमध्ये पुण्यातील डॉक्टरचा समावेश; साडेचार वर्षांच्या चिमुकल्यावर उपचार सुरु
बोटीवरील २० पर्यटकांपैकी १६ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. मात्र दोन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मृतांच्या नाका तोंडामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी गेल्याने गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला स्थानिक ग्रामीण रुग्णालयाने दुजोरा दिलाय. अन्य दोन पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आलीय. सद्यःस्थितीत बोटीतील सर्व पर्यटक सापडले आहेत, अशी माहिती पोलीस पाटील देवबाग यांनी दिलीय.
नेमक्या कोणत्या कारणामुळे अचानक ही बोट बुडली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नसली तर पर्यटनाच्या कालावधीमध्ये हा अपघात झाल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणामध्ये तारकर्लीला पर्यटक येतात. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी तारकर्ली हे हॉट फेव्हरेट डिस्टीनेशन ठरत आहे. मात्र आता या अपघातामुळे येथील पर्यटनाला धक्का पोहचू शकतो अशी चर्चा सुरु झालीय.