सावंतवाडी : विजयदुर्ग किल्ल्याचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नामांकन झाल्यानंतर आज प्रत्यक्षात युनेस्कोच्या पथकाने सकाळी विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यावेळी जवळपास तीन ते चार तास किल्ल्यावर आतून आणि समुद्रातून पाहणी केली. यामध्ये युनेस्कोचे जापनीज प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत मुंबई सर्कल, राज्य पुरातत्व विभागाचे संवर्धन अधिकारी शुभ मुजुमदार, जानवी शर्मा, शिखा जैन, केंद्र सर्वेक्षण पुरातत्व विभागाचे अन्य अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.
यावेळी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने पर्यटन मोसमामध्ये दर शनिवारी व रविवारी स्थानिक लोककला म्हणून सादर करणारे गिर्ये घाडीवाडी येथील ढोलपथकाने त्यांचे स्वागत केले. दरम्यान, विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळात सामील व्हावा या एकाच ध्येयाने प्रेरित झालेले विजयदुर्ग ग्रामस्थ, शिवप्रेमी यांनी बंदरामध्ये रांगेत उभे राहून त्यांच्या पथकाला मानवंदना दिली. जवळपास तीन ते चार तास संपूर्ण किल्ल्याची आतून पाहणी केल्यानंतर या पथकाने विशेष बोटीतून विजयदुर्ग किल्ल्याची पाण्याच्या भागातून पाहणी केली.
विजयदुर्ग किल्ल्यात प्रेरणोत्सव समितीच्या पर्यटकांसाठी ठेवण्यात आलेल्या विसावा केंद्रामध्ये या पथकाने स्थानिक ग्रामस्थांशी किल्ले विजयदुर्ग व येथील पर्यटन यासंदर्भात सुसंवाद साधला. यामध्ये विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, धुळप अर्थात सरदार घराण्याचे वारसदार रघुनाथराव धुळप, इव्हेंट ॲरेंजर बाळा कदम, व्यापारी व्यावसायिक प्रतिनिधी विवेक माळगावकर, पर्यटन बोट व्यावसायिक प्रतिनिधी सिद्धेश डोंगरे, महिला बचतगट प्रतिनिधी शीतल पडेलकर, मालपे येथील हॉटेल व्यावसायिक प्रसाद मालपेकर यांनी आपापल्या क्षेत्रातील पर्यटनाचे अनुभव आणि भविष्यकाळातील वेध घेतला.
किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी विजयदुर्ग किल्ल्याचा अष्टशताब्दी किल्ले महोत्सव, काव्यवर्षा, गो. नी. दांडेकर दुर्गसाहित्य संमेलन, लावणी फडातली लावणी शेतातली याचबरोबर येथील ग्रामस्थांनी आजवर केलेल्या कार्याची चित्रफीत सादर करून विजयदुर्ग किल्ल्याचं महत्त्व आणि येथील सांस्कृतिक वारसा त्यांच्यासमोर सादर केला. विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या वतीने प्रभारी सरपंच रियाज काझी, ग्रामपंचायत सदस्या शुभा कदम, प्रतिक्षा मिठबावकर, पूर्वा लोंबर, वैशाली कीर, हवाबी धोपावकर यांनी त्यांचं स्वागत केलं. आता विजयदुर्गवासीयांना युनेस्कोमध्ये स्थान मिळवण्याची प्रतिक्षा आहे.