आजचे शत्रू उद्याचे मित्र व आजचे मित्र उद्याचे शत्रू असेच काहीसे राजकारण सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुरू आहे. खासदार पुत्राला पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी काँग्रेस नेते, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग काँग्रेस बळकटीकरण्याच्या माध्यमातून शिवसेना व राष्ट्रवादीच्या मान्यवरांना पक्षप्रवेश देऊन राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
तिलारी ग्राहकांच्या प्रश्नासाठी थेट दिल्लीतून गल्लीत म्हणजेच तिलारीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार धावले. त्यांनी समयसूचकता राखत राष्ट्रवादीची कुचंबणा करणाऱ्या उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करीत निशाणा साधला, पण त्यामुळे राष्ट्रवादीची पडझड थांबणार नाही, हेही त्यांना समजल्याने आमदार दीपक केसरकर यांना प्रश्न घेऊन राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ७ जानेवारीला या, असे निमंत्रण दिले.
कोकणात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. रायगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नारायण राणे यांच्या रूपाने एकमेव आमदार आहे, तर राष्ट्रवादीकडे जलसंपदामंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, आमदार उदय सामंत, आमदार दीपक केसरकर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणात प्रस्थ वाढत आहे. त्यावर काँग्रेसने काय धोरण आखले आहे हे पाहण्यापेक्षा खासदार पुत्र नीलेश राणे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मात्र काँग्रेसचे बळकटीकरण सुरू केले आहे.
काँग्रेसमध्ये आजही निष्ठावंत गट आहे. या गटाला एकत्रित करून नेणारा कोणीही नाही, तसेच उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याची कोणात हिंमत नाही. हा निष्ठावंत गट काही प्रमाणात नारायण राणे यांच्यासोबत, तर काही प्रमाणात राष्ट्रवादीला सोबत देत आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्य़ाचे लोकसभा सदस्य म्हणून डॉ. नीलेश राणे कार्यरत आहेत. त्यांनी रत्नागिरीत काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी वेळही दिला. त्याचवेळी पालकमंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेस मजबूत करण्यासाठी धडपड सुरू केली.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसची खरी ताकद सर्वासमोर आली. जिल्ह्य़ातील चार तालुक्यांत विरोधक एकत्र आल्याने उभे राहिलेल्या चित्राचे अवलोकन केल्यास नारायण राणे यांचा एकतर्फी विजयाचा बालेकिल्ला ढासळत असल्याचे उघड झाले.
जिल्ह्य़ातील ३२२ ग्रामपंचायत निवडणुकांत घवघवीत यश मिळाले असल्याचा दावा काँग्रेस करत आहे, पण त्यामागील चित्राचेही आत्मचिंतन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जिल्हा परिषद सदस्यांना नारायण राणे यांनी प्रवेशाचा हात देऊन  राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचा प्रयोग केला. शिवसेनेच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आपल्याकडे खेचले.
राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांना एकाकी पाडण्याचा उद्योग जिल्ह्य़ातील नारायण राणे यांचे समर्थक करत आहेत. शिवाय पालकमंत्री नात्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही आमदार केसरकर यांना अभ्यास नसलेला आमदार म्हणून हिणवून जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी राणे यांनी पुढाकार घेतला आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याशी संघर्ष करणारे राष्ट्रवादीचे युवा नेते संदेश पारकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन राणे यांनी आता सिंधुदुर्गात कोणीही विरोधक उरला नसल्याचे जाहीर केले.
शिवसेनेचे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री असतानाही नारायण राणे यांच्या विरोधात संघर्ष करणारे संदेश पारकर यांनी काँग्रेस प्रवेश केल्याने ते नारायण राणे यांचे कालचे शत्रू आजचे मित्र बनले आहेत. संदेश पारकर यांचा संपर्क व प्रसंगाला धावणारे नेते म्हणून ग्रामीण भागात असणारी ओळख नारायण राणे यांना उपयोगी ठरेल, असा काँग्रेसचा मानस आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेस मजबूत आहे, पण काँग्रेसमध्ये झालेली गर्दी, दरबारी राजकारणामुळे विरोधकांनी एकजूट केल्यास फरक पडू शकतो, विरोधकांत एकजूट नाही तसेच विरोधकांना एकत्रित घेऊन जाणारा नेताही नसल्याचा फायदा नारायण राणे यांनी कायमच उठविला आहे.
खासदार पुत्राच्या निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्याची मानसिकता नारायण राणे यांच्यात नाही, त्यामुळे पक्ष प्रवेशाची भरती करून लोकसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळविण्याची जय्यत तयारी राणे करत आहेत.
जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा केंद्र व राज्यस्तरावरील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी राणे यांचा कायमच समन्वय असतो. त्या जोरावर राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय नेत्यांना काबीज करता येते, असा मानस राणे यांचा असल्याने जिल्ह्य़ातील नेत्यांना चुचकारण्याचे त्यांनी टाळले आहे.

Story img Loader