राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी आणि पाच जिल्हा परिषदा यांच्यात तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मुद्दा पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर राखून ठेवला गेला आहे.
आमदार दीपक केसरकर जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकारी आणि तालुका अध्यक्षांच्या भूमिका जाणून घेत आहेत. त्यानंतर येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीची भूमिका उघड होईल असे जाहीर करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग नसल्याची तक्रार काँग्रेस नेते नारायण राणे यांनी राज्य समन्वय समितीत केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे सिंधुदुर्गचा राष्ट्रवादीचा न्यायनिवाडा करण्यास सांगितले आहे असे सांगण्यात आले.
आमदार दीपक केसरकर यांच्या निमंत्रणावरून आज बैठक झाली असे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांनी स्पष्ट केले. आमदार केसरकर यांनी सर्वाशी या बैठकीत चर्चा करून मते जाणून घेतली. या बैठकीत प्रदेश सरचिटणीस शिवराम दळवी, नंदूशेट घाटे उपस्थित नव्हते. जिल्हा युवक अध्यक्ष अबीद नाईक उशिराने दाखल झाले.
आमदार दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष बाळ भिसे, माजी आमदार शंकर कांबळी, कोकण मत्स्योद्योग मंडळाचे उपाध्यक्ष पुष्पसेन सावंत, नगराध्यक्ष बबन साळगांवकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवाजी कुबल, स्नेहा कुबल, प्रसाद रेगे, अमित सामंत, रंजन चीके, नितीन वाळके, प्रफुल्ल सुद्रीक, अशोक दळवी, लॉरेन्स माटणेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश दळवी, जानव्ही सावंत, रेवती राणे, गौरव कुडवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांशी आम्ही सहमत आहोत असे भिसे म्हणाले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीचे ठराव सुपूर्द केले आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादीने सर्व माहिती ठेवली आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा असून येत्या दोन दिवसांत राष्ट्रवादीची भूमिका उघड होईल असे बाळ भिसे म्हणाले.
सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी असूनही पालकमंत्री नारायण राणे यांनी न्याय दिला नाही. उलट पक्षच कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जोपर्यंत अन्यायाला वाचा पक्षश्रेष्ठी फोडत नाहीत तोवर पांठिंब्याबाबतचा निर्णय नाही असे भिसे म्हणाले. शंकर कांबळी तीन टर्म आमदार होते. त्याशिवाय नारायण राणे यांना बळ देण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांना गुणी बाळ द्वेषापोटीच म्हणत आहेत असे भिसे म्हणाले.
जिल्ह्य़ातील विकास, शासकीय समिती, जेपी पदे यांबाबत अन्याय झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचे राजीनामे घेण्याची मागणी आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींकडून निर्णय अपेक्षित आहे. पक्षश्रेष्ठींनी निर्णय बाजूला ठेवून आघाडीचा धर्म पाळा असे म्हटले तर ‘पक्ष हवा की नेते हवे’ हे पक्षश्रेष्ठींना विचारू आणि भूमिका जाहीर करू असे बाळ भिसे म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा निश्चित झालेला नाही. पक्षाचा कोणीही यायचा असेल तर जिल्हाध्यक्ष नात्याने दौरा येतो, पण पवार साहेबांचा दौरा आला नसल्याने दौऱ्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका मांडता येणार नाही असे भिसे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्ह्य़ात पावणेदोन ते दोन लाख मतदार आहेत. अद्यापि कोणीही प्रचारात उतरलेले नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे असे भिसे म्हणाले. संदेश पारकर यांनी नारायण राणे यांचा यापूर्वी अपप्रचार केला होता. आता ते कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे जाणार आहेत, असा प्रश्न करत जनताच त्यांना जाब विचारून संदेश देईल, असेही भिसे म्हणाले.  येत्या सोमवार किंवा मंगळवारी भूमिका जाहीर होईल, असे बाळ भिसे यांनी सांगितले.