राज ठाकरे यांना महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारणी म्हणून मान्यता देणे कठीण आहे, पण नकलाकार म्हणून मान्यता देणे योग्य ठरेल असे ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. कोल्हापूर खंडपीठ होणे थोडे कठीण काम आहे, पण सिंधुदुर्गाने गोवा खंडपीठाला जोडावे म्हणून मागणी करणे योग्य ठरेल असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना राज्य अधिवेशनासाठी आलेले ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात बोलत होते. या वेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष बाळ भिसे व पदाधिकारी उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, नकलाकार म्हणून जनता राजला मान्यता देते. सुसंस्कृत राजकारणी म्हणून मान्यता मिळणे कठीण आहे, अशी टिपणी जयंत पाटील यांनी केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ होईल म्हणून अर्थमंत्री असताना नियोजन केले. त्यासाठी जागा पाहिली व खर्चही करण्यास प्रारंभ केला, पण खंडपीठासाठी न्यायालय परवानगी देण्यास तयार नाही असे जयंत पाटील म्हणाले. अ‍ॅड. सुभाष पणदूरकर यांनी हा मुद्दा उपस्थित करून सिंधुदुर्गला गोवा खंडपीठ जवळ असल्याने तेथे आमचा समावेश व्हायला हवा असे म्हणाले.
मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासोबत वर्षांतून एकवेळ बैठक असते. त्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी अजितदादांना गोवा खंडपीठाला सिंधुदुर्ग जोडावा, अशी रास्त मागणी करावी असे जयंत पाटील यांनी सुचविले.
शाळांचे मूल्यांकन झाल्याने गावागावात शाळांचा दर्जा पालकांना समजेल. त्यातून शैक्षणिक गुणवत्ता, दर्जा, भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्याला दिशा मिळेल. सिंधुदुर्गचे मूल्यांकन झाले आहे असे पाटील म्हणाले. शाळा मूल्यांकनामुळे शाळांचे चित्र उभे राहील असे ते म्हणाले.
पंतप्रधान सडक योजनात महाराष्ट्राला दुसऱ्या टप्प्यात सामावून घेण्यात आले आहे. ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांच्याशी चर्चा केल्यावर पंतप्रधान सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राला संधी मिळेल तशी बजेटमध्ये केंद्राने तरतूद केल्याचे सांगून इंदिरा आवास योजनेत केंद्र सरकारच्या पाश्र्वभूमीवर निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. या वेळी आनारोजीन लोबो, शिवप्रसाद कोळंबेकर, अणावकर गुरुजी, नगराध्यक्ष बबन साळगांवकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक उपस्थित होते.