सामाजिक कार्यकर्त्यां आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यामध्ये निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. सिंधुताई सपकाळ यांचं आठ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची महिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिलीय सिंधुताईंच्या निधनानंतर त्याच्या आठवणींना उजाळा दिला जात असतानाच त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी शेअर सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक निराधार व्यक्तींना आधार देणाऱ्या सिंधुताई आपल्या प्रेमळ बोलण्याने समोरच्याला पटकन आपलंसं करुन घ्यायच्या. लहान थोरांपासून सर्वांनाच त्या आपलं लेकरु मानायच्या. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही फोन करुन प्रोत्साहन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना सिंधुताईंनी केलेल्या या फोन कॉलची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती.

नक्की वाचा >> पद्मश्री स्वीकारतानाचा सिंधुताईंचा फोटो शेअर करत श्रद्धांजली वाहताना PM मोदी म्हणाले, “त्यांच्या प्रयत्नांमुळेच…”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सिंधुताईंमध्ये ९ एप्रिल २०२० रोजी फोनवरुन चर्चा झाली होती. महाराष्ट्रात करोनाच्या संकटाशी उद्धव ठाकरे ज्या प्रकारे लढत आहेत ते पाहून सिंधुताई सपकाळ यांनी त्यांचं कौतुक केलं होतं.

नक्की वाचा >> सिंधुताईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला…; शरद पवारांपासून नितीन गडकरींपर्यंत अनेक मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

“उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे सगळी जबाबदारी तू उत्तमरित्या पेलतो आहेस,” असं माई म्हणजेच सिंधुताई सपकाळ म्हणाल्या होत्या. दोघांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं ते पाहूयात…

उद्धव ठाकरे : हॅलो..

माई : हॅलो..

उद्धव ठाकरे : हां उद्धव बोलतो आहे, सिंधुताई नमस्कार

माई : बाळा बोल बोल..बेटा..बाळासाहेबांच्या पिल्ल्या बोल..

उद्धव ठाकरे: हं..हो.. काहीनाही मला कुणतरी तो व्हॉट्स अॅप एक पाठवला आपले आशीर्वाद मिळाले.

माई : बाबा केवढी कसोटी आहे लेकरा… केवढी कसोटी आहे..

उद्धव ठाकरे : अहो माई तुम्ही तर आयुष्यभर कसोटी सहन करत आहात..

माई : अरे पण त्या कसोटीला धीराने तोंड देतोस तू.. खरंच. बाळासाहेबांचं रक्त..समर्थपणे पुढे चालला आहेस

उद्धव ठाकरे: मग…मागे नाही हटणार मी. मागे हटणार नाही.

माई : नाही रे.. तू मागे हटणार नाहीस

माई : उद्धवा आणि सांगायचं होतं बेटा.. एवढा सिंपल मुख्यमंत्री कुठेही बदल नाही तुझ्यात..पावलं उचलताना वाटलं नव्हतं तू एवढा खंबीर होशील म्हणून..

उद्धव ठाकरे : अहो मुख्यमंत्रीपद वेगळं काय असतं? आपण आहोत तसं रहावं.

माई: खरं रे खरं..महाराष्ट्राचं रक्त इतकं खंबीर असू शकतं..केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..बाळा.. केवढी आव्हानं तुझ्यासमोर.

उद्धव ठाकरे : पार पाडणार..तुमचे आशीर्वाद आहेत ना मग बस..

माई : अरे बाबा आहे रे आहेत..काय रे पिल्ला आशीर्वाद आहेतच कायमच

उद्धव ठाकरे  : तुम्ही पण काळजी घ्या..बाहेर जाऊ नका.

माई : तू पण बेटा, जगाची काळजी तुझ्यावर आहे आता. महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बाळ तू पण काळजी घे बेटा

उद्धव ठाकरे: काळजी घ्या..

माई : हां हे सगळं निवळल्यावर मी येऊन जाईन बेटा

उद्धव ठाकरे : या या अवश्य या.

माई : हो रे बेटा.. पण सांभाळ, काळजी घे पिल्ला काळजी घे. मीनाताईचं दूध आहे तुझ्यात काही हरणार नाहीस तू.

उद्धव ठाकरे : हो माई..

माई : अच्छा बेटा.

हा संवाद एखाद्या आई आणि मुलामधल्या संवादासारखाच असल्याच्या भावाना संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर व्यक्त करण्यात आल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sindhutai sapkal death when sindhutai sapkal phone call cm uddhav thackeray had conversation about maharashtra coronavirus situation scsg