सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे हे चौथे सत्र. चढता उत्साह, श्रोत्यांच्या अव्यक्त वाढत्या अपेक्षा व कुतूहल यामुळे ह्य़ा कलामहोत्सवाची रंगत दिवसागणिक वाढतच होती व आहे. तशातच या संपूर्ण सवाई स्वरमंदिराचे भूमिभजन व पायाभरणी केलेल्या पं. भारतरत्न भीमसेन जोशी यांचा कृपाप्रसाद लाभलेली काही भाग्यवान मंडळी आहेत, त्यापैकी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक पं. उपेंद्र भट यांनी या चौथ्या सत्राचे पहिले पुष्प वाहिले.
शिष्य खरा तो ज्याच्या केवळ अस्तित्वाने, ‘दर्शनमात्रे’ गुरूंची आठवण यावी अशा शिष्योत्तमामध्ये पं. उपेंद्रजी भट हे आहेत. स्वराच्या लगावापासून ते थेट पोशाखापर्यंत सर्व काही भीमसेनी थाट अशा या ‘भीमसेनमय’ झालेल्या या गुणी गायकाकडे पाहिले, की स्व. ज्योत्स्ना भोळे यांचे ‘मी राधा मीच कृष्ण एकरूप झाले।’ हे गीत आठवते आणि हे गीत म्हणजे कवी कल्पना नसून अशी एकरूपता उपेंद्रजींमध्ये अंतर्बाह्य़ आपण पाहू शकता.
सर्वप्रथम त्यांनी मियॉ तानसेन संशोधित ‘मियॉ की तोडी’ सादर केला. भारदस्त आलापांनी अतिशीघ्र राग उभा करण्याचे त्यांचे सामथ्र्य, स्वरांची मजा घेत आणि देत गायन करण्याची पद्धत अवर्णनीय आहे.
जी गोष्ट आलापीची तीच तानप्रक्रियेची, कुठल्याही स्वरापासून सुरू होणारी तान कुठल्याही स्वरावर संपविता यावी, हा भीमसेनजींचा दंडक त्यांनी अक्षरश: पाळला. विलंबित एकतालामधील ‘सैय्या बर हूँ’ आणि द्रुतत्रितालामध्ये ‘लंगर कांकरिया जीन मारो।’ ही भीमसेनजींचीच स्वरकलाकृती त्यांनी खूप सुरेखपणे मांडली.
यानंतर पं. भीमसेनजी यांनी संगीत दिलेले ‘धन्य ते गायनी कळा’ या नाटकामधील ‘चिरंजीव राहो।’ हे नाटय़गीत ललत भटियारमध्ये बांधलेले झपतालात सादर केले. शेवटी ‘कृष्ण कृष्ण कहिये।’ हे भजन दाद देऊन व अपुरा वेळ ही हुरहूर लावून गेले. स्वरसंवादिनीवर श्रीकांत पिसे, तबला- अविनाश पटवर्धन, व्हायोलिन- रमाकांत परांजपे, पखवाज- उद्धव गोळे, श्रुती- देवव्रत भातखंडे व शंतनू पानसे यांचे होते. दुसरे स्वरपुष्प गुंफण्यासाठी जयंती कुमरेश स्वरमंचावर आल्या. या वीणा वादिकेचे स-वीणा रूप पाहून ‘या वीणा वरदंडमंडित करा। या श्वेत पद्मासना ।’ अशी माता सरस्वती-शारदेची पवित्र मूर्ती डोळ्यासमोर उभी राहत होती. सर्वप्रथम या वादिकेने राग ‘शुद्ध सावेरी’ ही गुणकली रागाशी साधारण मिळतीजुळती अशी गत सादर केली.
आलापीचे काय वर्णन करावे? आपल्या हिंदुस्थानी संगीतामध्ये २२ श्रुती जरी असल्या, तरी ‘कोमलस्वर, तीव्र स्वर लावा’ असे सांगितले जाते पण या दाक्षिणात्य संगीतामध्ये मात्र दोन श्रुतींचा रिषभ लावा. तीन श्रुतींचा अमुक स्वर लावा असे सांगितले जाते. थोडक्यात स्वरांचा सूक्ष्मतम स्वराविष्कार झाला पाहिजे, सर्व काही शास्त्रशुद्ध, विधिवत व्हावे हा कडवा आग्रह. पण याच कटाक्षामुळे हे संगीतही हजारो वर्षे जसेच्या तसे टिकून आहे. यानंतर खमाज राग सादर केला. त्यानंतर ‘कामवर्धिनी’ हा राग पुरिया धनाश्रीशी मिळताजुळता ठायी ठायी टाळ्या घेऊा गेला. गमक मींड, सूंथ यांनी खचाखच भरलेले हे तालबद्ध, लयबद्ध वीणावादन श्रोत्यांना स्वर्गीय सुखाच्या अशा वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. पखवाज व घटम तसेच वीणा यांचे सवाल-जवाब खूप हर्ष देऊन गेले.  घट हे नुसते घट नसून ‘मधुघट’ आहेत, हे आणि स्वर आणि तालाच्या मधूने ओतप्रोत भरलेले आहेत. रिकामे पडलेले नाहीत. हे ‘रसिकश्रोत्या पी हवे तेवढे!’ हे स्व. कविवर्य भा. रा. तांबे यांनी ‘मधु मागशी माझ्या सख्या परी । मधु घटची रिकामे पडती जरी।।’ ही हुरहूर मनातून काढून टाका, असे या घटमचे वादन ऐकून त्यांना नम्रपणे सांगावेसे वाटते. हा अक्षय स्वरतालांनी भरलेला आणि भारलेला घट आहे. शेवटी राग बिहागने हे स्वर्गीय वादन थांबले.
या सत्राचे शेवटी पं. अजय चक्रवर्ती यांचे गायन झाले. राग गायनाचे शेवटी भैरवी घेतली जाते परंतु या गायकाने सुरुवातीपासूनच भैरवी हा ख्याल विलंबित एकतालामध्ये सादरीकरणासाठी निवडला. या रागाचा स्वरविचार, त्याचे अनेक पदर, अनेक कोन व पैलू यांचे दर्शन या विलंबित सादरीकरणामुळे श्रोत्यांना घडले. ‘करम करो मोरे साई’ ही स्वरचित बंदिश खूपच भावपूर्ण होती. गमक, जबडातान, पुकार, खटक्याचा ताना, बोल ताना, आरोही-अवरोही ताना, मिश्र व कूट ताना यामुळे एक प्रकारचे बौद्धिक आवाहन श्रोत्यांपुढे उभे केले. लय अगदी अंगात मुरलेल्याचे जाणवत होते. ‘ऐसो री रैना, माने ना बतिया’ ह्य़ा उस्ताद बडे गुलामांच्या बंदिशीने गायन भावपूर्ण अंत:करणाने थांबविले. त्यांना साथसंगत अशी होती- तबला- भादुडी इंद्रनील, स्वरसंवादिनी- अजय जोगळेकर, तानपुरा- अमोल निसळ, मेहेर परळीकर व ब्रिजेस्वर मुखर्जी.
आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन खूपच छान केले. गेली २२ वर्षे सवाई गंधर्व आणि त्याआधी आकाशवाणी असे उभे आयुष्य त्यांची धीराची आश्वासक शुद्ध वाणी म्हणजे कलाकार आणि श्रोते यांच्या मधला हा ‘रामसेतू’ आहे. त्यामुळेच या दोघांमधील अंतर संपले आणि ‘हातात हात घालून। हृदयास हृदय जोडून।’ हा सवाईचा गंधर्वचा प्रवास असाच अमर चालत राहील यात मला शंका नाही. यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Story img Loader