६० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव : दुसरे सत्र
वेणुविशारद
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे पुष्प दुसरे. सरस्वती शारदेचा महोत्सव; मोठमोठे महान कलाकार जन्मतात, आमरण संगीताची साधना करतात आणि हेतू विचारला तर सांगतात पुण्याच्या महोत्सवात एकदा तरी माझी संगीत सेवा सादर व्हावी सरस्वती शारदा मातेच्या चरणी.
यावर्षीही असेच देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठमोठे कलाकार आले. पहिला दिवसही उत्साहात पार पडला. पण दुसरा दिवस मात्र अतिदारुण दु:खाचा उगवला. भारतरत्न पं. रविशंकर, नादब्रह्माचा अंश नादब्रह्मात विलिन झाले; कायमचे. शारदामाता विणेशिवाय कशी तरीच दिसू लागली. बासरीशिवाय कृष्ण कसा दिसेल. अगदी तशीच. वीणेवीणा शारदेची कशी पूजा करायची?
अशा या ‘विकल मनाच्या अवस्थेत सर्व कलाकार आपली संगीत सेवा सादर करीत होते. सतार ऐकावी तर पं. रविशंकरांची. सतार आणि पंडितजी हे दोन्हीही एकच. सतारीचेच दुसरे नाव पं. रविशंकर. विलंबित खर्जाचे त्यांचे जवारीच्या तारेवरील काम असो, मिंड काम असो. सूंथ असो. ऐकावी तर पंडितजींची. लयकारी तीही सौंदर्यपूर्ण अशी की तिथे कुठेही करामतीची, चढाओढीची, वर्चस्व दाखविण्याची मानवी कुरुपता त्यांच्या वादनात कुठेही नव्हती. सौंदर्याची अतिव पिपासा तसेच आपल्या वादनामधून आनंद देणे आणि आनंद घेणे, यापलीकडे या महान कलाकाराला काहीच नको होते. महाभारतामध्ये म्हटले आहे, ‘ज्याचे आयुष्यात कुठल्याही अपेक्षेला थारा नसतो, त्याचे जीवन आनंदाने ओसंडून वाहत असते.’ पंडितजींच्या आयुष्यामधून या वसुंधरेवरील समस्त मानवी जातीला, पशू, पक्षी वनचरांना, वृक्षवल्लींना जो हा नादाचा आनंद आजवर मिळाला हा या त्यागतपस्वी, शारदेचा पुत्र पंडितजींच्या त्यागावर आधारित संगीत समर्पणावर जगणाऱ्या जीवनाचा सु-परिणाम आहे, हेच सत्य होय. त्यांच्या या महान अभिव्यक्ती जीवनास साष्टांग प्रणाम!
पंडितजींच्या या अजोड कार्यास श्रद्धांजली वाहिल्यानंतर व्यासपीठावर पं. रतन मोहन शर्मा यांचे आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी राग शुद्ध वराळी अतिशय सुरेख सादर केला. नैसर्गिक भारदार आवाज. अचूक, स्वर शब्द, स्वरवाक्ये यांनी राग सौंदर्य वाढतच गेले. ‘आयी अतिधूम’ ही मेघ रागातील गत.
‘अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण करून गेली. निरेगधनी’ हा त्रितालामधील दृत सरगम तराणा खूपच आकर्षक, देखणा सादर केला. मिया तानसेनच्या काळापासूनचा ‘नोम तोम’ तंतकारी प्रकार अनेक ठिकाणी प्रेक्षकांची मोठी दाद घेऊन गेला.
शेवटी संत चोखा मेळा यांचा ‘अबीर गुलाल उधळीत रंग।’ हा स्व. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी श्रोत्यांच्या अंत:करणात कायमचा नेवून बसविलेले अभंग गायला. ‘पुन्हा गा’ अशी मागणी या अभंगास सातत्याने होत होती. वेळेअभावी अपूर्ततेच्या अवस्थेत त्यांना गायन थांबवावे लागले आणि हीच खरी गायन सुरेख झाल्याची पावती होती.
तबल्यावर पं. कालिनाथ मिश्रा, तर पखवाजवर श्रीधर पार्थसारथी यांनी आपल्या साथीमधून तर ‘अवघी पंढरी’ उभी केली. पं. मुकुंद पेटकर यांनी स्वरसंवादिनीवर उत्तम स्वरसाथ केली.
यानंतर स्वरमंचावर श्री. अयान आणि श्री. अमान अली खाँ बंगश या बंधुद्वयांचे आगमन झाले. उस्ताद अमजद अली खाँ यांचे पुत्र असून शिष्यपण आहेत. त्यांना तबला साथ पं. चटर्जी तसेच श्री. सत्यजित वळवलकर यांची होती. ही साथ व हे सरोदवादन विक्रमी रंगणार याची खात्री श्रोत्यांना झाली. त्यांनी सर्वप्रथम सादरीकरणासाठी राग श्री ची निवड केली. हा पूर्वी थाटातील सायंकालीन राग सायंकालीन वर्णन करण्यास, तसेच सायंकालचा सर्वच प्राणीमात्राचा परतीचा प्रवास घराकडील ओढ, हूरहूर दर्शवितो. रिषभ, पंचम, तीव्र मध्यम, अशी मिंड, रे प, ध या स्वरांवर विविध प्रकारांनी न्यास यामुळे राग श्री खुलून येतो. सरोद या वाद्यास तर हा राग म्हणजे पर्वणीच. लांबचे सूंथ, मिंड, गमक अशी विस्तारास विविधग दाखविण्यास भरपूर वाव असतो. या दोन्ही बुद्धिमान तरुण कलाकारांनी भरपूर मेहनत, रियाज करून या रागावर चांगलेच प्रभुत्व मिळविले आहे. बहुतेक सर्वच स्वरस्थानांना उचित न्याय दिला आहे. ‘श्री’ रागाचे विविध पदर आपल्या रेशमी पोत असलेल्या सरोदच्या स्वरांनी खुलून दाखविले. गमक तसेच तंतकारी यांच्या तसेच लयकारीच्या तानामुळे श्रोत्यांची तर ‘घेता किती दोन्ही करांनी’ अशी अवस्था झाली.
दृत झपताल तसेच त्रितालामधील श्री रागातील गत प्रचंड तालांच्या किमया व वेग दाखवून विक्रमी प्रतिसादाने संपविली. आपल्या वादनाची सांगाता त्यांनी रागेश्री रागाने अडा चौतालामध्ये केली. वरील सर्व वादन प्रथमपासून शेवटपर्यंत ऐकल्यावर व पाहिल्यावर एक जाणवले की या वादनामध्ये कुरघोडी, खेचाखेची, अहमिकेची कुठेही भावना नव्हती, तर हातात हात घालून संत तुकोबांच्या ‘या रे नाचू अवघे जण। भावे प्रेमे परिपूर्ण।।’ अभंगानुसार उच्च कोटीचा बंधुभाव, बंधुप्रेम वादनामधून साहचर्यरूपाने ठायी ठायी दिसत होते. अद्वितीय, देखणे, सुंदर असे वर्णन या सरोदवादनाचे करता येईल. यानंतरचा संगीताचा नृत्य हा प्रकार सादर करण्यासाठी श्रीमती शोभना चंद्रकुमार या प्रतिथयश नृत्यविशारद, नृत्य दिग्दर्शिका, उच्च व्यवस्थापिका, अनेक मानसन्मानप्राप्त कलावती व्यासपीठावर अवतिर्ण झाल्या. त्यांना साथसंगत अशी होती- बासरी-महेश मृदंगम-श्री रामकृष्णम, व्हायोलिन- श्रीव्यंकट सुब्रह्मण्यम, गायन- प्रीती महेश, तंबोरा- राजश्री महाजनी, ताल- विद्या रामचंद्र. श्रीमती शोभना यांनी मल्लारी हा भरतनाटय़ममधील नृत्य प्रकार सादरीकरणासाठी घेतला. अतिशय सुंदर पदन्यास, चापल्य आणि तालाची अंगभूत उपज, उत्तम साथ-संगत यामुळे ही रचना उत्तम प्रतिसाद देऊन गेली. यानंतर वर्णम यामध्ये अभिनय नृत्य पदन्यास आणि श्रृंगार रस यांचा समावेश असतो. ही रचना सादर केली. तिसरा ‘कृती’ हा रामचरितमानस सादरीकरणाचा नृत्य प्रकार सीता कल्याणम तसेच जयदेवा अष्टपदी सादर केला. भारताचा सांगितिक वारसा, नृत्य इत्यादी जसाच्या तसा जपला, जोपासला कुणी असेल तो दक्षिण भारताने. हा संपूर्ण द्रविड संस्कृतीचा वारसा त्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे.नृत्य प्रकाराच्या भावमुद्रा जर स्थिर चित्रण पद्धतीने जर अलग अलग केल्या तर हजारोंच्या घरात जातील. चेहऱ्यावरील भाव किती प्रकारांनी बदलू शकतात यांचा हा सर्वोच्च बिंदू होता. त्यामध्ये सौंदर्य, कुरूपता, उग्रता, बिभत्सताही होती. छायाचित्रे घेऊन जर हे नृत्य आणि अंगविक्षेपाचे प्रकार चितारले तर किती प्रकारची अजंठा, वेरुळसारखी शिल्पे होतील याची गणती नाही. यामधील बासरीवादनाला तोड नाही. हृदयस्पर्शी बासरीवादन काय चमत्कार दाखवू शकते, हे या कलाकाराने दाखवून दिले. इतरही तालवाद्य हा कार्यक्रम रंगविण्यास कारणीभूत साहाय्यभूत ठरली हे या द्रविडवाद्यसमूहाचे यश आहे. यानंतर या स्वरपुष्पाच्या अखेरचे सत्र गायनाचे होते. ‘गायनाचे अंगी अद्भूत कळा हे जगती।’ या संत तुकाराम महाराजांचे अभंगाचा प्रत्यय पं. राजन, पं. साजन मिश्रा यांच्या गायनात आला. या आधी त्यांचे चिरंजीव तसेच शिष्य श्री. रितेश व श्री. रजनीश मिश्र यांनी राग जोग सादर केला. ही बनारस घराण्याची सातवी पिढी. मध्येच सिंहासारखी गर्जना तर मध्ये भान विव्हल अत्यंत नाजूक हळूवार स्वर याने रागातील चैतन्य श्रोत्यांच्या अंत:करणापर्यंत पोहोचले.
गायनाची अद्भूत कला अनुभवण्यासाठी ज्याची श्रोते उत्सुकतेने वाट पाहात होते ते पं. राजन, पं. साजन यांचे गायन सुरू झाले. सुरुवातीस राग बागेश्रीमधील विलंबित एकतालामधील ‘सजन कासे कहू’ ही बंदिश सादरीकरणासाठी त्यांनी घेतली आणि या बंदिशीचे त्यांनी अक्षरश: सोने केले. आलापीने रागातील तसेच काव्यातील भाव किती सुंदर दाखविता येतो हे या ज्येष्ठ श्रेष्ठ बंधूंनी दाखवून दिले.
सध्या गायनवादन म्हणजे द्रुतगती मार्गावरून टोल फ्री धावणारा कलाकार, तबला पुढे की मी गायक-वादक पुढे अशा स्पर्धेत उतरला आहे. त्यांना सांगावेसे वाटते अरे, संगीत हे अमूल्य पवित्र शांती प्रसविणारे आणि पसरविणारे सर्व श्रेष्ठ माध्यम आहे आणि स्वर.. स्वर तर रेशीम पोत घेऊन जन्मलेले. .. ‘दिल है नाजूक मेरा- शिशेसे भी टूटे न कही’ या तलत मेहमूदच्या गीतानुसार. त्यंना तर किती नाजूकपणे हाताळले पाहिजे. हे संगीत हा अमूल्य ठेवा अत्यंत आस्थापूर्वक प्रेमाने हाताळा. असा धसमुसळेपणा करू नकोस. तर असा हा अव्यक्त संदेश पंडितजी आपल्या गाण्यातून नेहमीच श्रोत्यांना रसिकांना देत असतात. आजच्या धकाधकीच्या खडखडाटाच्या जीवनप्रणालीमध्ये ‘पुण्याची’ व्याख्या बदलून पं. मिश्रा बंधूंच्या शांतीस्वरूप पसरविणाऱ्या गाण्यास ‘पुष्प’ समजावे असे वाटू लागले आहे. यानंतर त्यांनी ‘अडाणा बहार’ हा टप खयाल सादर केला. टप्पा आणि खयाल याचे सुंदर मिश्रण म्हणजे टप खयाली, गळ्यामध्ये फिरक खूपच आवश्यक असते. इथे सर्वच काही विपूल आहे. छान रंगत आली या टप खयालाने खटक्या मुटक्या सरगम आणि गमक हे सर्व प्रचंड टाळ्याच्या कडकडाटाने संपले. तबला साथ पं. अरविंदकुमार आझाद तसेच स्वरसंवादिनीवर पं. अरविंद थत्ते यांची होती.
जगत मे झुटी.. प्रीत या भजनाने या दिव्य गायनाची समाप्ती पंडितजींनी अत्यंत भावपूर्ण शब्दस्वरांनी केली.
।। गायनाचे अंगी अद्भूत कला हे जगति।।
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आजचे पुष्प दुसरे. सरस्वती शारदेचा महोत्सव; मोठमोठे महान कलाकार जन्मतात, आमरण संगीताची साधना करतात आणि हेतू विचारला तर सांगतात पुण्याच्या महोत्सवात एकदा तरी माझी संगीत सेवा सादर व्हावी सरस्वती शारदा मातेच्या चरणी.
First published on: 14-12-2012 at 04:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singing is art of living