सिन्नर तालुक्यातील रेल्वे प्रकल्पासाठी संयुक्त मोजणी सुरू असताना गुरुवारी नायगाव येथे काही जणांनी लहान मुले आणि महिलांना पुढे करून मोजणीत अडथळा आणल्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रशासनाने कारवाई केली नाही, अशी माहिती तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी दिली. मोजणीत अडथळे आणणाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष आर्थिक क्षेत्र, इंडिया बुल्सचा वीज प्रकल्प आणि प्रस्तावित नाशिक-पुणे लोहमार्गासाठी या रेल्वेमार्गाचा उपयोग होणार आहे. सिन्नर रेल्वे प्रकल्पात आतापर्यंत जोगलटेंभी, हिंगणवेढे, जाखोरी, पिंपळगाव, दशवंडी, पाटपिंप्री, गुळवंचच्या शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्यांनी करारनामे करून दिले आहेत.
या प्रकल्पासाठी प्रस्तावित असलेल्या क्षेत्रापैकी केवळ तीन गावांची संयुक्त मोजणी अपूर्ण राहिली आहे. त्यात नायगाव, बारागाव पिंप्री आणि एकलहरा या गावांचा समावेश आहे. गुरुवारी शासकीय अधिकारी, मोजणी अधिकारी पोलीस बंदोबस्तात नायगाव येथे मोजणीसाठी गेले असता काही जणांनी लहान मुले आणि महिलांना पुढे करत मोजणीस विरोध करून कामात अडथळा आणला, असे तहसीलदार सैंदाणे यांनी नमूद केले आहे. नायगावच्या बहुतांश प्रकल्पग्रस्तांनी रेल्वे मार्गासाठी शासनाने जाहीर केलेला दर मंजूर असल्याचे जिल्हा प्रशासनाला यापूर्वीच निवेदन दिले आहे. त्यामुळे या सुमारे ३२ किलोमीटर रेल्वे मार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला दर मंजूर असल्याची संमती विविध गावांच्या सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी शासनाला दिली आहे.

Story img Loader