ज्येष्ठ नागरिकांना मानाने-सन्मानाने जगता आले पाहिजे. तो ज्येष्ठांचा मूलभूत अधिकार ठरतो. ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनदरबारी समस्यांच्या निराकरणासाठी व अन्य सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी संघाला मागण्या कराव्या लागतात. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघशक्तीची आवश्यकता असते. त्या दृष्टीने डोंबिवलीमध्ये आजमितीस २२ ज्येष्ठ नागरिकांचे संघ कार्यरत आहेत. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खोपोली शहर व खालापूर तालुका परिसरात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यावर व संघशक्ती वृद्धिंगत करण्यावर भर द्या, ती काळाची गरज आहे, असे आग्रही प्रतिपादन फेस्कॉमच्या कोकण प्रादेशिक विभागाचे कोषाध्यक्ष सुभाष परांजपे यांनी केले. मंगळवारी (४ डिसेंबर) ज्येष्ठ नागरिक सभा-खोपोलीचा १९वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणेपदावरून ते बोलत होते. नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, फेस्कॉमच्या प्रादेशिक सचिव निशिगंधा जोशी, सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार दामोदर शहासने, अन्य मान्यवर व मोठय़ा संख्येने महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नागरिक सभा खोपोलीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सुर्वे यांनी भूषविले होते.
ज्येष्ठ नागरिकांनी काळानुरूप बदलाला सकारात्मक दृष्टीने सामोरे जावे. भविष्यात निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी आवर्जून इच्छापत्र तयार करावे. पेन्शनधारक ज्येष्ठांनी नियोजित वेळेत बँकेकडे हयातीचा दाखला सादर करावा, असा सल्ला देत, सुभाष परांजपे यांनी पुढे बोलताना ज्येष्ठ नागरिक सभा-खोपोलीच्या उल्लेखनीय कार्याचे तोंडभरून कौतुक केले. सभेला शेवटी शुभेच्छा व्यक्त केल्या, त्याला प्रादेशिक सचिव निशिगंधा जोशी यांनी बोलताना दुजोरा दिला. ज्येष्ठ नागरिकांनी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी चळवळ उभी करावी. शासनाकडून उपलब्ध झालेल्या विविध सवलतींचा लाभ घ्यावा, अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या ज्येष्ठांच्या फेस्कॉम संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. एका ज्येष्ठाने दुसऱ्या ज्येष्ठाच्या मदतीसाठी धावून जावे. ज्येष्ठ नागरिक सभेने विविध प्रशिक्षणांचे उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असा सल्ला फेस्कॉमचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार दामोदर शहासने यांनी या प्रसंगी बोलताना दिला. ज्येष्ठ नागरिक सभा खोपोलीला न.पा.तर्फे सभागृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सभागृहात ज्या ज्या साधनांची आवश्यकता आहे त्या साधनांची यादी तत्परतेने न. पा. प्रशासनाकडे सादर करा. यादीतील सर्व साधने २६ जानेवारीपूर्वी उपलब्ध करून देण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष मसूरकर यांनी या प्रसंगी बोलताना दिली. ज्येष्ठ नागरिक सभेने परिसरातील सर्व जातीधर्मातील ज्येष्ठांना सदस्य करून घेण्यावर भर द्यावा. आपल्या क्षेत्रातील अनुभवाचा लाभ भावी पिढीला देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५१ हजार रुपयांची देणगी देण्याची घोषणाही केली. त्यांनी वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सभेला शेवटी शुभेच्छा व्यक्त केल्या.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत तसेच संस्थेच्या कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या, विवाहाला ५० वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांचा, नगराध्यक्ष मसूरकर, फेस्कॉमचे परांजपे, निशिगंधा जोशी, दामोदर शहासने व सभाध्यक्ष बाबासाहेब सुर्वे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन या प्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये नागरमल तिवारी, धाईंजे, उंबरकर, शंकर दत्तू घाटके, मांगिलाल जाखोटिया, सोमनाथ मोरे, रझिया जमादार, प्रमिला बेलसरे, विमलाताई ढवळे, गजानन अष्टीकर, डॉ. डी. के. जोशी, श्रीकृष्ण दातार, सुधा इतराज, शांताबाई पाटील, जनार्दन फुलारे, उमेश फुलारे, दिगंबर सुतार इत्यादी ज्येष्ठांचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिक सभेचे अध्यक्ष बाबासाहेब सुर्वे, उपाध्यक्षा सुधा इतराज यांच्या हस्ते या प्रसंगी नगराध्यक्ष व फेस्कॉमचे प्रतिनिधी यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती प्रमिला बेलसरे, विमलाताई ढवळे यांनी या प्रसंगी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना बाबासाहेब सुर्वे यांनी समाजातील सर्व स्तरांतील नागरिक, नगराध्यक्ष- नगरसेवक यांचे ज्येष्ठ नागरिक सभेला वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन, भविष्यात ज्येष्ठ नागरिक सभेतर्फे भरीव कामगिरी करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सा. जिद्द’चे संपादक तथा ज्येष्ठ नागरिक सभेचे सदस्य रवींद्र घोडके यांनी केले होते. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ नागरिक सभेच्या महिला व पुरुष सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. शेवटी कार्यवाह जनार्दन फुलारे यांनी आभार मानले. पसायदानानंतर सोहळ्याची सांगता झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा