रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटल्याप्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापनाही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत माहिती दिली आहे.

रत्नागिरीत झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आहे. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण बेपत्ता झाले आहेत. सहा मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. तिवरे धरण फुटल्याने शेजारच्या सहा ते सात गावांना या घटनेचा फटका बसला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांना संबंधीत ठिकाणी भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना इथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.