उद्योगसमूहांची आर्थिक ताकद आता समाजाची विचारक्षमता नियंत्रित करू पाहत असून त्यामुळे आणीबाणीपेक्षाही अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, असे स्पष्ट मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथालय विभागातर्फे ‘संवाद लेखकाशी’ उपक्रमांतर्गत ते बोलत होते.
पेड न्यूजचा प्रकार या उद्योग संचालित नियंत्रित व्यवस्थेचाच भाग असून पत्रकारच त्यात सहभागी होऊ लागल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याचे ते म्हणाले. पत्रकारांनाही माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याची मागणी करीत त्यांनी या परिस्थितीत जी वृत्तपत्रे पेड न्यूज संस्कृतीला दूर ठेवतात, त्यांच्यामागे वाचकांनी खंबीरपणे उभे राहावयास हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मराठी वाङ्मयाविषयी बोलताना कुबेर म्हणाले की, मराठीत कादंबरी झेपत नाही म्हणून बरेचसे कथालेखन झाले. त्यात मराठी लेखकांचे अनुभवविश्व मर्यादित त्यामुळे हे लेखन पचपचीत आहे. कालसापेक्ष आणि वास्तवदर्शी लिहिणारे व नवीन शब्द निर्माण करणारे लेखक घडत नाहीत. त्याचा परिणाम सध्याच्या पिढीची मराठी भाषा मांडणारे लेखन न होण्यावर झाला आहे. वाङ्मय म्हणजे केवळ ललित लेखन असा समज झाला आहे त्यामुळे एक साचलेपणा आला असून कालसुसंगतपणा दिसत नाही. जगात अनेक घडामोडी घडत असताना ते विषय मराठी साहित्यात दिसत नाहीत, अशी खंत कुबेर यांनी व्यक्त केली.
तेल उत्पादन व पुरवठय़ातील अर्थकारण या विषयावर पुस्तक लेखनाची संधी ‘इकॉनॉमिक्स टाइम्स’मध्ये काम करताना जगभरातील भ्रमंतीतून मिळाली. या क्षेत्रातील घडामोडी जवळून पाहायला मिळाल्या. त्यात नाटय़, क्रौर्य, नातेसंबंध असे मानवी भावविश्वाशी निगडित सर्व पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले.
 गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रा. अनंत येवलेकर व वंदना अत्रे यांनी कुबेर यांची मुलाखत घेतली. मराठी साहित्य, पत्रकारितेतील प्रवास, राजकीय घडामोडी, आर्थिक साक्षरता, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग अशा विविध विषयांवर त्यांनी वाचकांशी संवाद साधला. पत्रकारितेतील प्रवासात ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांनी केलेली जडणघडण आणि मार्गदर्शनाविषयीचे अनेक अनुभव कुबेर यांनी नमूद केले. नव्या पिढीतील पत्रकारांकडून इंग्रजी, हिंदीमिश्रित मराठी भाषा वापरली जात आहे. एकाही भाषेवर प्रभुत्व नसल्याने त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी होते. इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरणे म्हणजे मेंदूचा कमीतकमी वापर करण्यासारखे आहे. ज्या भाषेच्या वर्तमानपत्रात आपण काम करतो, त्या भाषेवर प्रेम आणि निष्ठा हवी. ती नसल्यामुळे अशा पत्रकारांकडून वाचकांचा विश्वासघात होत आहे. इंग्रजी शब्दांचा वापर टाळून मराठीत पर्यायी शब्द शोधायला हवेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यांविषयी न्यायालयाने दिलेल्या निर्णयांसंदर्भात आश्चर्य व्यक्त करीत न्यायालये राजकीय पक्षांना असे कसे सांगू शकतात, असा प्रश्न कुबेर यांनी उपस्थित केला. प्रत्येक राजकीय पक्षाच्या खुपणाऱ्या बाजू समोर आणण्याचा आपला प्रयत्न असतो. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांचा दबावगट निर्माण होणे गरजेचे आहे. नागरिकांची अर्थसाक्षरता वाढविणे आवश्यक आहे. अर्थभान नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे शासनाला लुटण्याचा व्यवसाय असून ते बंद करणे गरजेचे असल्याचेही कुबेर यांनी स्पष्ट केले.

Story img Loader