नांदेड : कंधार तालुक्यातील कौठा येथील कृषि व्यावसायिक गजानन येरावार यांच्या घरात घुसून शस्त्राचा धाक दाखवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम लुटत चोरट्यांनी पळ काढला होता. या प्रकरणात पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे २९ लाख ४३ हजार ४६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोमवारी दुपारी वार्ताहर बैठकीत दिली.

१५ जून रोजी पहाटे तीन वाजता घराचा दरवाजा गॅस कटरने कट करून या दरोडेखोरांनी येरावार यांच्या घरात प्रवेश केला होता. त्यानंतर घरातील सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून ४० तोळे सोने आणि २२ लाख रुपये रोख असा ऐवज पळविला होता. पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी विविध पथके तयार करून या दरोडेखोरांच्या शोधासाठी पाठविले होते. सोनूसिंग भोंड (रा.गुजरात), जयसिंग बावरी (रा.गुजरात) अरुण गोरे (रा.उस्माननगर), शेख खदीर, (रा.धनेगाव), राजासिंग टाक (रा.परभणी), गुरुमुखसिंग टाक (रा.परभणी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दरोड्याची कबुली दिली. तसेच सतबीरसिंघ टाक (रा.अकोला), जसपालसिंग धुन्नी (रा.जालना), राजपालसिंघ दुधानी (रा.बुलढाणा), सरदारखान अमिरुल्लाखान (रा.पुसद), मॉन्टीसिंग (रा.धुळे) हे देखील सहभागी असल्याचे सांगितले मात्र हे पाच  दरोडेखोर पसार असून पोलिस शोध घेत आहेत. दरोडेखोरांकडून पोलिसांनी ४० तोळे सोन्याचे दागिणे, ५५ ग्रॅम चांदीचे दागिणे आणि ८ लाख ५० हजार रुपये रोख जप्त केले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six accused in kautha robbery arrested amy
First published on: 24-06-2024 at 22:04 IST