रत्नागिरी जिल्ह्य़ातील जाकादेवी येथे सेंट्रल बँकेवर पडलेल्या दरोडय़ातील सर्व, सहाही आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींपैकी मुख्य सूत्रधार सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खंडणी, मारहाण, लूटमार इत्यादीचे नऊ गुन्हे दाखल आहेत.
या बँकेवर गेल्या २८ नोव्हेंबर रोजी आरोपींनी दरोडा घालून एका कर्मचाऱ्याला ठार केले, तर एकजण गंभीर जखमी झाला. बँकेच्या तिजोरीतील सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम घेऊन आरोपी खासगी वाहनाने फरारी झाले. या संदर्भात स्थानिक व्यक्तीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे विभागीय पोलीस अधिकारी तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या तुकडीने चिकाटीने प्रयत्न करून आरोपींना पकडण्यात यश मिळवले. या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – राजेंद्र राजावत (वय २५, रा.कल्याण), हरिष गोस्वामी (वय २५, रा.कल्याण), प्रथमेश सावंत (वय १८, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे (वय २५, रा.कल्याण), निखिल सावंत (वय २४, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार (वय २८, रा. मुंबई).
जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक पांडय़े यांनी या प्रकरणी बुधवारी येथे पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, सबंध जिल्ह्य़ाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकारानंतर तपासासाठी पोलिसांच्या विविध तुकडय़ा करण्यात आल्या. त्यापैकी पाटील यांच्या नेतृत्वाखालील तुकडीला गेल्या शनिवारी जाकादेवी परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून काही माहिती मिळाली. त्या आधारे वेगाने तपास करत राजावत याला सर्वप्रथम पकडण्यात आले. त्यानंतर एका पाठोपाठ आणखी चार आरोपी मुंबई, कल्याण, जाकादेवी इत्यादी ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणातील शेवटचा आरोपी आणि सूत्रधार प्रशांत शेलार याला मुंबईत ताब्यात घेतले असून येथे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोपींपैकी राजावत मूळचा मध्य प्रदेशातील असून गेली आठ वष्रे कल्याणला राहत आहे. बँकेतील कर्मचाऱ्याला त्यानेच ठार मारल्याचा संशय आहे. तो लाईफ स्टाईल कंपनीत नोकरीही करत होता. अन्य आरोपींपैकी गोस्वामी प्लंबर, भिसे ड्रायव्हर तर शेलार बांधकाम ठेकेदाराकडे नोकरी करत होता. प्रथमेश आणि नीलेश चुलत भाऊ असून त्यांच्या संपर्कातून दरोडय़ाचा कट शिजला असावा असा संशय आहे. दरोडा घातल्यानंतर सर्व आरोपी कारमधून सावडर्य़ापर्यंत एकत्र गेले. तेथे चौघेजण खाली उतरले आणि रेल्वेने मुंबईला गेले, तर शेलार गाडी घेऊन गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून त्यांच्या माहितीमध्ये विसंगती आहे. त्यामुळे आणखी तपासानंतर सर्व तपशील उघड होऊ शकेल, असे पांडे यांनी स्पष्ट केले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पकडलेल्या आरोपींपैकी दोघांची ओळख स्पष्टपणे पटली आहे. मात्र कायद्याच्या दृष्टीने आवश्यक रीतसर ओळखपरेड करण्यात येईल. गुन्ह्य़ामध्ये वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली असून लुबाडलेली रोख रक्कम आणि गुन्ह्य़ात वापरलेले पिस्तुल जप्त करावयाचे असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मजूर, मेकॅनिक, हॉटेलातील स्वागतकक्ष कर्मचारी अशा प्रकारची वेषांतरे करावी लागल्याचे तपासाचे सूत्रधार पोलीस अधिकारी पाटील यांनी नमूद केले.
बँक दरोडय़ातील सहा आरोपी जेरबंद
रत्नागिरी जिल्ह्य़ातील जाकादेवी येथे सेंट्रल बँकेवर पडलेल्या दरोडय़ातील सर्व, सहाही आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
आणखी वाचा
First published on: 12-12-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six accused involved in bank robbery arrested