लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : महाड येथील पिंपळदरी मोरांडे वाडी येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना रायगड पोलीसांनी जेरबंद केले आहे. याच पाच पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र बांग्लादेशी घुसखोरांविरोधात शोध मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यात बांग्लादेशी घुसखोरांचा शोध सुरू करण्यात आला होता. या शोध मोहीमे दरम्यान महाड तालुक्यातील पिंपदरी मोरांडे वाडी येथे काही बांग्लादेशी घुसखोर लपून बसल्याची माहिती गोपनीय सुत्रांमार्फत मिळाली होती. त्यानुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने पिंपळदरी मोरांडे वाडी येथील एका घरावर छापा टाकला.

आणखी वाचा-अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण

तेव्हा या ठिकाणी ६ बांग्लादेशी घुसखोर आढळून आले. ते एका बांधकाम कंपनीत कामगार म्हणून कार्यरत होते. पोलीसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतात प्रवेशाची कुठलिही वैध कागदपत्र आढळून आली नाही. चौकशी साठी सर्वांना ताब्यात घेतले असता, त्यांनी बांग्लादेशातील उपासमारीला कंटाळून रोजगाराच्या शोधात गस्ती पथकांची नजर चुकवून भारतात प्रवेश केल्याचे त्यांनी मान्य केले.

माणिक तुफेझेल विशष वय ३२, नूर इस्माईल बिस्वास उर्फ सिंकदर रोने मानेरुल खान वय ३०, सागर मिराज शेख वय ३०, शांतु शकुरअली शेख वय १९ आणि शिलीम हामशेर परमणी वय ४० अशी या बांग्लादेशी घुसखोरांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात देशात अवैध घुसखोरी केल्याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आणखी वाचा-दाभोळ-मुंबई एस.टी. बस खोल धरणात कोसळताना वाचली; ४१ प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संजय मुंडे, समेळ सुर्वे, सहाय्यक फौजदार हनुमंत पवार, दिपक ढेपे, पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर, चनप्पा अंबरगे, सिध्देश मोरे, पोलीस नाईक राजेश माने, सतीश बोटे, गणेश भैलुमे, पोलीस शिपाई सुनील पाटील, शुभम पवार, सुजील गौंधळी, सागर गुलींग, विजय दळवे, तेजश्री भोईर यांनी गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली.

Story img Loader