कराड: कराड नगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर बुधवार पेठ परिसरात आज बुधवारी (दि. १७) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास एका घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला गळती लागून झालेल्या मोठ्या स्फोटात सहा जण जखमी झाले. या स्फोटाने एकच गोंधळ उडताना, परिसरातील लोक घटनास्थळी धावले.
हेही वाचा >>> शेतीचे विज्ञान नव्याने समजून घेवून सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीच करावी, देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आवाहन
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की या गॅस सिलिंडर स्फोटाचा फटका लगतच्या घरांनाही बसून, एकूण सहा जण जखमी झाले आहेत. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. अनिता मोरे (वय ५८), संगीता भोसले (वय ५०), मालन भोसले (वय ४०), किरण बडेकर (वय ५०), अमोल भोसले (वय ३२), उमेश दुबळे (वय ३५ सर्व राहणार बुधवार पेठ, कराड) हे या स्फोटात जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, कराड नगरपालिकेचा अग्निशामक बंब आणि पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अग्निशमन दलाचे जवान, पोलीस व स्थानिकांनी जखमींना येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवले. येथे जखमींवर उपचार सुरू आहेत.
पुनः पुन्हा गॅस सिलिंडर गळती
अलीकडेच शहराच्या मुजावर कॉलनीत शरीफ मुल्ला यांच्या घरात सकाळच्या प्रहरी झालेल्या स्फोटात मुल्ला कुटुंबातील चार आणि शेजारील असे नऊजण जखमी होताना, सहा वाहनांचे व शेजारील घरांचे नुकसान झाले. पुढे उपचारा दरम्यान, मुल्ला कुटुंबातील सर्व म्हणजेच शरीफ मुल्ला, त्यांची पत्नी व दोन मुलांचे निधन झाले होते. या घटनेबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले गेले. असे असताना आता बुधवार पेठेत गॅस सिलिंडर गळतीनेच मोठा स्फोट झाल्यानें आश्चर्य व्यक्त होत असून, कराडमधील गॅस सिलिंडरला गळती लागतीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे.