सांगली : मोरबगी (ता.जत) येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा कर्नाटकात रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. नाताळ सुट्टीसाठी मोरबगीचे हे कुटुंब मूळगावी परतत असताना मोटारीवर कंटेनर पलटी झाल्याने हा अपघात रात्री घडला.
बंगळूर ते गुंटूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात मूळचे मोरबगी (ता.जत) येथील रहिवाशी असलेले चंद्रम इराप्पा इगाप्पागोळ यांच्यासह कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये त्यांच्यासह पत्नी, एक मुलगा, दोन मुली व भावजय यांचा समावेश आहे. या अपघाताचे वृत्त समजताच मोरबगी गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
इगाप्पागोळ (वय ४६) हे आपल्या एसयुव्ही (केए ०१ एनडी १५३६) वाहनांने नाताळ सुट्टीसाठी गावी मोरबगी (ता. जत) येथे येत होते. बंगळूर- गुंटूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कंटेनर यांचा अपघात झाला. याच दरम्यान, त्यांची मोटार पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना कंटेनर त्यांच्या मोटारीवर कोसळला. यामुळे मोटार पूर्णपणे दबली गेल्याने मोटारीत असलेल्या सहा जणापैकी कोणालाही बाहेर पडता आले नाही. ही घटना बंगलोर जिल्ह्यातल नेलमंगळा तालुक्यातील तळकेरे गावाजवळ घडली. अपघातानंतर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला केल्यानंतर आतील प्रवाशांना बाहेर काढता आले.मृतामध्ये चंद्रम इगाप्पागोळ यांच्यासह पत्नी धीराबाई (४०), मुलगा गण (१६), भावाची पत्नी विजया लक्ष्मी (वय ३५), मुली दीक्षा (१०) आणि आर्या (६) या सहा जणांचा समावेश आहे.