वाडी उपक्रमातून शेतकऱ्यांना दिलासा
शासनाच्या योजनांपासून वंचित शेतकरी कुटुंबांना वाडी उपक्रमाने नवी उभारी दिली असून, भावी पिढीसाठीही संचित निर्माण केल्याचे चित्र पुढे आले आहे. आत्महत्याग्रस्त वर्धा जिल्ह्य़ातील वाडी उपक्रम सहा हजारांवर शेतकरी कुटुंबांना जीवनाचा अर्थ सांगण्यासोबतच निसर्गाचे रक्षण करण्यातही यशस्वी ठरत आहे.
वाडी म्हणजे शेतजमिनीचा एक एकराचा तुकडा. त्यावर फ ळझाडे, औषधी वनस्पती व वनसंवर्धनार्थ मोठय़ा वृक्षांचे जतन करण्याचा प्रयोग आहे. वनपरिसरातील आदिवासी शेतकरी कुटुंबांनाही यात सामावून घेण्यात आले आहे. शेती, फ ळबाग व वनसंपत्तीचे हे तिहेरी संवर्धन वाडीमधून करण्यात येते. आदिवासी कुटुंबांचे स्थलांतरण थांबविण्याच्या हेतूने त्यांच्या परिसरातच अन्नधान्य, फ ळे, जळावू लाकडे, बांबू, चारा व याद्वारे नियमित उत्पन्न मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. आदिवासीबहुल क्षेत्राखेरीज अन्य शेतकरी कुटुंबांचे आरोग्यसंरक्षण, मृदसंधारण, जलस्त्रोत वाढविणे, शेतीचे उत्पन्न, महिला सक्षमीकरणाचेही हेतू यामागे आहेत. नाबार्ड व बजाज फोऊंडेशनचा हा संयुक्त उपक्रम आहे. एक एकराच्या वाडीसाठी ४० हजार रुपयांचा खर्च मान्य असून, यापैकी ७० टक्के निधी नाबार्ड व ३० टक्के निधी बजाज फोऊंडेशनने पुरस्कृत केला. वाडी प्रकल्पाचे समन्वयक सुरेंद्र फोसगे यांनी हा प्रकल्प आतापर्यंत सर्वच तालुक्यांत सुरू झाल्याचे नमूद केले. ३ हजार १७० आदिवासी कुटुंबांसह एकूण ५ हजार ९२० कुटुंबांना २ लाख १० हजार २५५ फ ळ रोपे व बांधावर लावण्यासाठी ३ लाख ४९ हजार वनरोपेही देण्यात आली आहेत. एवढय़ाच कुटुंबांच्या म्हणजे, ५ हजार ९२० एकर संख्येत जमीन लागवडीखाली आली. उन्हाळ्यात केशर आंबे, तसेच विविध ऋतूत येणाऱ्या पेरू, निंबू, आवळा अशा रोपांची लागवड झाल्याने शेतकऱ्यांना वर्षभर उत्पन्न मिळण्याचा हा खात्रीशीर मार्ग ठरला आहे, असे फोसगे यांनी निदर्शनास आणले.
वाडी प्रकल्पाच्याच माध्यमातून १६२ सार्वजनिक विहिरी तयार होणार आहेत. दोन हजार कुटुंबांना फ क्त भाजीपाला लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. ३२० आदिवासी पण शेतीवंचित कुटुंबांना संकरित गायी देण्यात आल्या आहेत. केवळ एकोच पिकावर भर न देता आंतरपिकांच्या विविधतेलाही प्रोत्साहित करण्यात येत आहे. वनक्षेत्रालगत असणाऱ्या वाडय़ांना तारेचे कुंपण मिळाले आहे. सिंचनासाठी शेततळांचाही पर्याय या मुख्य प्रवाहाच्या बाजूला पडलेल्या वंचित शेतकऱ्यांना मिळाला आहे. वाडी प्रकल्प तात्पुरत्या उत्पन्नासाठीच मर्यादित नसल्याचे नाबार्डचे प्रतिपादन आहे. पुढील ४० ते ५० वर्षे ही एक एकराच्या वाडीतून एका कुटुंबाचे जीवन संरक्षित करण्याची खात्री दिली जाते. एका कुटुंबास वर्षभरच दीड लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.

बाजारपेठेचाही विचार
वाडीतून पहिल्या वर्षांपासून शेतीच्या माध्यमातून, तर पाच वर्षांनंतर फ ळबागांच्या माध्यमातून नगदी उत्पन्न मिळेल. उत्पादन झाले तरी पुढे त्याच्या विक्रीचे काय, या प्रश्नाचेही नियोजन बजाज फोऊंडेशनने केले आहे. उत्पादित माल योग्य बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी व चांगला बाजारभाव मिळण्यासाठी साधने निर्माण करण्याचे निश्चित झाले आहे. केवळ पावसावर अवलंबून राहिल्यास हा प्रयोग यशस्वी ठरणे शक्य नाही म्हणून सिंचनाच्या विहिरी व अन्य सोयी निर्माण करण्यात आता या वाडीमालक शेतकरी कुटुंबांनीच पुढाकार घेतला आहे.