सोलापूर : शेतातील मजुरीचे काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी एहाटी बसची वाट पाहात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला शेतमजुरांना भरधाव वेगातील २० चाकी मालमोटारीने जोरात ठोकरल्याने घडलेल्या भीषण अपघातात सहा महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन महिला जखमी झाल्या.
अश्विनी शंकर सोनार (वय ३२), इंदुबाई बाबा इरकर (वय ५०), कमल यल्लाप्पा बंडगर (वय ४८), सुलोचना रामचंद्र भोसले (वय ४२), श्रीमाबाई लक्ष्मण जाधव (वय ४५) आणि मनीषा आदिनाथ पंडित (वय ३२) अशी या भीषण अपघातात जागीच मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी महिला शेतमजुरांची नावे आहेत. तर सिंधुबाई रघुनाथ खरात (वय ४६) आणि नीताबाई दत्तात्रय बंडगर ( वय ४८) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
हेही वाचा…गैरकारभारामुळे जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त करावा यासाठी चाबूक मोर्चा काढणार- खोत, पडळकर
पंढरपूर-कराड रस्त्यावर सांगोला तालुक्यातील चिकमहूद गावाजवळ मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. सांगोला तालुक्यातील कटफळ येथील राहणाऱ्या आठ महिला शेतमजूर ऊस लागवडीसाठी चिकमहूद गावाखालील बंडगरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सकाळी नऊ वाजता आल्या होत्या. चिकमहुद व कटफळ हे सहा किलोमीटर अंतर आहे ऊस लागवड करून सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावी परत जाण्यासाठी पंढरपूर-कराड रस्त्यावर चिकमहूदजवळ बंडगरवाडी येथे रस्त्याच्या कडेला या आठ महिला शेतमजूर एसटीची वाट पाहात थांबल्या होत्या. परंतु पंढरपूरहुन कराडला जाणारी वीस चाकी मालमोटारीने (एमएच ५० एन ४७५७) वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांना जोरात ठोकरले. अपघात घडताच तेथे गोंधळ उडाला. स्थानिक तरूणांनी मदतकार्य केले.मालमोटारचालकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले.
हेही वाचा…दिल्लीतल्या बैठकीत निर्णय, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार!
या अपघाताची माहिती मिळताच सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे व सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंणदाळे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. चिकम-कटफळ रस्ता मृत्युचा सापळा ठरला असून अधुनमधून तेथे लहानमोठे अपघात होतात. मागील वर्षभरात या रस्त्यावर अपघातात २५ पेक्षा जास्त जीवांचे बळी गेले आहेत. हा रस्ता चारपदरी होण्यासाठी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी लक्ष घालावे, अशी मागणी चिकमहूदचे ग्रामपंचायत सदस्य किशोर महानवर यांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पंढरपूर-आटपाडी-विटा-कराड- चिपळूण या राज्य मार्गावर पथकर नाका नसल्याने अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अरूंद रस्ता आणि दुभाजकही नसल्याने पुढील वाहनांना सर करून पुढे जाण्याच्या नादात सातत्याने अपघात होतात.