अलिबाग- सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबाग येथे आयोजित केले जाणार आहे. ८ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारीला कुरुळ येथील क्षात्रक्य समाज सभागृहात होणाऱ्या या संमेलनास देशभरातील शेतकरी साहित्यिक सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक भास्कर चंदनशिव असणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास खासदार संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक गंगाधर मुटे यांनी दिली.

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य आणि शेतकरयांची सांगड घालण्याच्या दृष्टीने या शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. शेतीच्या व्यथा मांडणारी साहित्य चळवळ निर्माण करण्याच्या दृष्टीने या संमेलनाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

८ फेब्रुवारीला उद्घाटन सत्रात मा. राजीव खांडेकर, संपादक, एबीपी माझा, मा. श्री. सुनील तटकरे खासदार, रायगड, मा. सरोजताई काशीकर, माजी आमदार, मा. एॅड सतीश बोरुळकर प्रमुख अतिथी म्हणून तर स्वागताध्यक्ष मा. अ‍ॅड. प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष मा. गंगाधर मुटे प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत.

वरिष्ठ पत्रकार मा. आदिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सत्राला मा. ना. कु.अदिती तटकरे, राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन, आमदार मा. महेंद्र दळवी, नगराध्यक्ष मा. प्रशांत नाईक, कृषी अर्थतज्ज्ञ मा. संजय  पानसे, मा. कैलास तवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader