लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : केवळ लिहिता-वाचता येणाऱ्या औपचारिक शिक्षणापेक्षा व्यवसायाभिमुख, कौशल्याधारित शिक्षण प्रणालीच देशाचा विकास घडवून आणू शकते. पिढ्यान् पिढ्यांपासून सुरू असलेली प्रचलित शिक्षण पद्धती बदलण्याची गरज असून, कौशल्याधारित शिक्षण पद्धतीच विकासाचे दार खुले करू शकते, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने यंदाचा कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्मृती सामाजिक परिवर्तन गौरव पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांना राज्यपाल बागडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. माशेलकर व डॉ. काकोडकर यांच्यासह माजी आमदार राजेंद्र राऊत, संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील हे उपस्थित होते.

राज्यपाल बागडे म्हणाले, चुकीची व सदोष शिक्षण प्रणाली देशाला आणि समाजाला लयाला नेते. भारत देशाला प्राचीन काळापासून शास्त्रज्ञांची मोठी परंपरा असताना ती खंडित झाली आहे. ही खंडित परंपरा पुन्हा सुरू होण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहनपर भरीव आर्थिक तरतूद केली आहे. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्यात येत असल्याबद्दल बागडे यांनी प्रशंसनीय उद्गार काढले.

पुरस्काराचे मानकरी डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मनोगत मांडताना आपल्या आईचे स्मरण केले. आई अशिक्षित असतानाही तिने मला खूप शिकविले. मी मोठा झाल्यानंतर दिलेले पैसे तिने कधीही खर्च केले नाहीत. आईच्या निधनानंतर सर्व पैसे बंद कपाटात तसेच होते. सोबत चिठ्ठी होती. त्यात आईने लिहिले होते, परिस्थितीची जाणीव ठेव. हे पैसे ज्यांना संशोधन करण्याची इच्छा आहे, अशा गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वापर. कर्मवीर मामासाहेब जगदाळे हे सर्वांची प्रेरणा आहे.

डॉ. अनिल काकोडकर यांनी नव्याचा शोध घेत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची ओढ लागणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. नवतंत्रज्ञानामुळे सक्षमता लाभते. सक्षमता समाजाला आणि देशाला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरते, असेही त्यांनी नमूद केले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. डी. वाय. यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या समारंभाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Story img Loader