जीवनात गुणवत्ता व कर्तृत्व कोणीही थांबवू शकत नाही

मेहनत करीत राहिले पाहिजे. लढाईत हरणारा कधीही संपत नाही, रणांगण सोडून जाणारा संपतो. संघर्ष करूनच मोठे होता येते. मी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना मुंबईत ५५ उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी हजारो कोटी रुपयांची कामे सुरू केली होती. त्यावेळी माझ्याकडे किती निधी आहे व तो पाहता प्रकल्प पूर्ण होण्यास किती वर्षे लागतील, असा प्रश्न पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. तेव्हा मी सांगितले होते, की माझ्याकडे केवळ पाच कोटी रुपये आहेत, पण प्रचंड इच्छाशक्ती आहे. ती नसेल, तर नुसत्याच परिषदा, चर्चा, बैठका, परिसंवाद होतात व प्रत्यक्षात काम कधीच होत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही मला हा प्रकल्प पूर्ण करून दाखव, असे सांगितले होते आणि मी ते काम केले. त्यामुळे इच्छाशक्ती नसेल तर, काही वेळा सरकारमध्ये काम करताना दफ्तर दिरंगाईमुळे कालहरण होते.

कोणीही पूर्णांक नाही

सार्वजनिक जीवनात काम करीत असताना आपण केलेल्या कामाचा आपल्यालाच उल्लेख करावा लागतो. आपल्यात कोणीही पूर्णांक किंवा शंभर टक्के परिपूर्ण नाही. आत्मविश्वास, अभिनिवेश जरूर असावा, पण अहंकार असू नये. सकारात्मकता, पारदर्शकता, इच्छाशक्ती, समर्पण वृत्ती आदी गोष्टींनुसार काम केल्यास यशाचे शिखर गाठता येते. प्रशासन यंत्रणेतील काही अधिकारी वर्षानुवर्षे फायली अडवितात. त्यांनी कोणताही निर्णय घ्यावा, पण कालापव्यय करू नये.

‘लोकसत्ता’ चा पुरस्कार विश्वासार्ह

सध्या समाजात पुरस्कार व प्रायोजकत्व देणाऱ्यांची आणि पुरस्कार मिळावा, म्हणून काही देणाऱ्यांची कमी नाही. सध्या ‘माध्यमे व्यवस्थापन’ (मीडिया मॅनेजमेंट) चे प्रकारही सुरू आहेत. मात्र त्यास ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्रसमूह आणि ‘लोकसत्ता’ अपवाद आहे. समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांनी मोठी किंमत मोजली, पण माध्यम स्वातंत्र्य व निरपेक्षता जपली, कधीही तडजोड केली नाही. त्यामुळे लोकसत्ता’ची आणि ‘तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी निवड समितीत असलेल्या मान्यवरांचीही विश्वासार्हता खूप मोठी आहे. आपल्या चांगल्या कामाचे कौतुक व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पण सरकारमध्ये चांगल्या कामाचा सन्मान होत नाही व वाईट काम करणाऱ्याला शिक्षा होत नाही. हा केवळ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ‘तरुण तेजांकितां’चा गौरव करण्याचा कार्यक्रम नसून त्यांच्या उदाहरणातून लाखो लोकांना चांगले काम करण्याची प्रेरणाही मिळते. ‘लोकसत्ता’ ने सकारात्मक व्यक्तित्व व कर्तृत्व लोकांसमोर आणले आहे. सध्या करीत आहात, त्याहूनही या तरुणांनी खूप मोठे काम करावे.

जीवनात कौशल्य महत्त्वाचे

मला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ खूप लोकप्रिय होता. व्हिव्हियन रिचर्ड्स, सोबर्स व अनेक जलदगती गोलंदाजांचा दरारा होता. त्यांच्या वेगवान गोलंदाजीला तोंड देण्यासाठी खूप ताकद असावी लागते, असे मला त्यावेळी वाटत असे. पण विख्यात खेळाडू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांची उंची लहान असूनही ते जलदगती गोलंदाजीचा आरामात सामना करीत होते. त्यासाठी खेळातील कौशल्य महत्त्वाचे असते, हे मला त्यांच्याशी चर्चेनंतर उमगले. जीवनात कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. कुठेही शॉर्टकट नसतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रचंड मेहनत करणे आवश्यक असून तरच यशोशिखर गाठता येते.

शब्दांकन : उमाकांत देशपांडे