माथेरानमध्ये लवकरच आकाशदर्शन प्रकल्प साकारला जाणार आहे. रायगड जिल्हा वार्षिक योजनेतील नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार असून, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ द. कृ. सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.
माथेरानमधील पेमास्टर्स पार्कजवळ हा प्रकल्प उभारला जाणार आहे, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नावीन्यपूर्ण योजना म्हणून हा आकाशदर्शन प्रकल्प उभारला जाणार आहे. माथेरान बाजारपेठ परिसरापासून १०० ते २०० मीटर अंतरावरील अग्निशमन केंद्राची जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. ही जागा माथेरानमधील सर्वात उंच ठिकाण असल्याने आकाशदर्शनासाठी उपयुक्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.
हा प्रकल्प खगोल अभ्यासक आणि पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. कारण या प्रकल्पात खगोल अभ्यासासाठी एक भली मोठी आणि अत्याधुनिक अमेरिकन बनावटीची दुर्बीण बसवली जाणार आहे. या दुर्बिणीची किंमत साधारणपणे १२ लाखांच्या आसपास असणार आहे. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मदतीने या दुर्बिणीचे संचालन केले जाणार आहे. तर पर्यटकांना हाताळण्यासाठी तीन ते चार लहान दुर्बिणी टेलीस्कोप बसवले जाणार आहेत. हे टेलीस्कोपही अमेरिकन बनावटीचे असणार असून त्यांची बाजारातील किंमत प्रत्येकी तीन ते चार लाख असणार आहे.
दुर्बिणीच्या माध्यमातून पर्यटक आणि खगोल अभ्यासकांना ३ लक्ष ८४ हजार किलोमीटरवरचा चंद्र, १५ कोटी किलोमीटर अंतरावरचा सूर्य, ९ प्रकाशर्वष अंतरावरील व्याध तारका, ६८ प्रकाशर्वष अंतरावरची रोहिणी तारका पाहता येणार आहे. तर चंद्रावरची विवरे, गुरू ग्रहाचे चार चंद्र, शनीभोवतीची वलये, शुक्राची कोर, द्वैती तारका पाहण्याचा आनंद मिळू शकणार आहे. मानातील कुतूहल आणि जिज्ञासा जागृत होण्यास मदत होणारा आहे. २०१३च्या अखेपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंत बांठीया यांनी या अभिनव प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. तर खगोलशास्त्रज्ञ द. कृ. सोमण हे प्रकल्पाच्या उभारणीसाठी मदत आणि मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा नियोजन अधिकारी राजेश तितर यांनी जागेची पाहणी केली आहे. या वेळी माथेरानचे नगराध्यक्ष अजय सावंत, मुख्याधिकारी मोरखंडेदेखील उपस्थित होते. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा