राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर जाधव यांच्या एका वक्तव्यामुळे शुक्रवारी विधानसभेत विदर्भाच्या प्रस्तावावरील चर्चा तापली. विदर्भाच्या बाजूने आणि विरोधात घोषणा उमटल्या. ‘जाधव यांचा तसा उद्देश नसला तरी ते वाक्य बोलायला नको होते’ असे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर लगेचच जाधव यांनी दिलगिरी व्यक्त करून वाक्य परत घेतले.
विदर्भ वेगळा न करता विदर्भाचा सर्वागीण विकास व्हावा व वर्तमान सरकार तो कसा करणार, अशी मागणी करणाऱ्या विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर शुक्रवारी सकाळी चर्चा सुरू झाली. आशिष रणजित देशमुख यांनी अनुशेषासाठी न रडता आता विदर्भासाठी लढायचे असून विदर्भ वेगळा झालाच पाहिजे, असे मत मांडले. त्याबरोबर शिवसेनेच्या काही सदस्यांनी ‘अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. त्याबरोबर ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’ अशा घोषणा सत्ताबाकावरील विकास कुंभारे, सुधाकर कोहळे व आणखी काही सदस्यांनी दिल्या. शिवसेनेचे मुंदडा यांनी आशिष देशमुख यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला.
काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी भास्कर जाधव याच्या भाषणाप्रति तीव्र रोष व्यक्त केला. आत्महत्या करण्यात कुणाला खुशी आहे? असा सवाल करून भास्कर जाधव जोशपूर्ण बोलत असले तरी त्यांनी विदर्भातील शेतकऱ्याला हिणवले आहे. विदर्भ कोकणापेक्षा मोठा आहे. विदर्भ वेगळा व्हायलाच हवा तरच त्याचा विकास होईल, असे वडेट्टीवार म्हणाले. भास्कर जाधव यांनी विदर्भातील शेतकऱ्याच्या जखमांवर मीठ चोळले असल्याचे सत्ताबाकावरील सुरेश सागर म्हणाले. यावेळी पुन्हा घोषणा झाल्या. विदर्भातील शेतकऱ्याबद्दल अनुद्गार काढले नसून त्यांचे प्रबोधन व्हावे, असे म्हटल्याचे जाधव म्हणाले.
या गोंधळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे झाले. भास्कर जाधव अभ्यासू, माहितीपूर्ण बोलतात. आजही ते बोलले. प्रबोधन व्हावे, हे ठीक असले तरी प्रत्येक भागातील परिस्थिती वेगळी असते, काही घटना घडलेल्या असतात. पण जाधव ..वाक्य बोलले. त्यांचा तसा उद्देश नसला तरी ते वाक्य बोलायला नको होते, असे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर लगेचच जाधव यांनी दिलगिरी व्यक्त करून वाक्य परत घेतले. तेव्हा सभागृहातील वातावरण शांत झाले.
विदर्भासंबंधीच्या प्रस्तावर सकाळी दहा वाजता कामकाज सुरू झाले. मात्र, यावेळी गणपूर्तीअभावी सदनाचे कामकाज पंधरा मिनिटे तहकूब करण्यात आले. ही चर्चा सुरू असताना चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार सभागृहातून बाहेर गेले.
भास्कर जाधव म्हणाले..
कोकणात अनेक वादळे वा अतिवृष्टी झाली तरी तेथील शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. कोकणातील सर्वच शेतकरी श्रीमंत नाहीत. कोकणातील स्त्री गरिबीचे प्रदर्शन करीत नाही. उलट विदर्भात सातत्याने नकारात्मकतेचे सातत्याने दर्शन होते. विदर्भात सर्वाधिक भारनियमन होत असले तरी ते विजेचा योग्य वापर न केल्याने होते. मिळेल त्यात समाधानी वृत्तीच विदर्भात नाही. मागणी करणारा दुसरा किती अडचणीत आहे याचा विचारच करीत नाही, असे जळगाव जामोदमध्ये बोललो होतो. मात्र, दगडफेक झाली नाही. विदर्भातील शेतकऱ्याचे सामाजिक प्रबोधन व्हायवा हवे, असे जाधव बोलत असतानाच सत्ताबाकावील सदस्यांनी उभे राहून गलका केला.