पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून दहा वर्षांआतील मुलींसाठी सुरू केलेल्या सुकन्या समृद्धी गुंतवणूक योजनेत पाच महिन्यांत केवळ सात हजार पालकांनी सहभाग नोंदवली. यावरून या योजनेकडे बहुतांशी पालकांनी पाठ फिरवल्याचेच दिसत आहे. गावापर्यंत माहितीचा अभाव आणि टपाल खात्यात योजनेच्या अर्जासाठी प्रादेशिक भाषेचा अभाव यामुळे ही योजना पालकांपर्यंत पोहोचलीच नसल्याचे चित्र आहे.  
जिल्ह्यात मुलींचा जन्मदर मोठय़ा प्रमाणात घटल्याचे समोर आल्यानंतर हा प्रश्न देशपातळीवर चर्चिला गेला. मुलींचा जन्मदर वाढावा, या साठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनीही देशभरातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी त्यांना समाजात स्थान मिळावे, पालकांना त्या बोजा वाटू नयेत, या साठी जानेवारीत टपाल खात्यामार्फत ‘सुकन्या समृद्धी’ ही योजना सुरू केली. योजनेंतर्गत शून्य ते दहा वर्षे वयोगटाच्या आतील मुलींच्या नावाने टपाल खात्यात रक्कम जमा केल्यानंतर ९.१ टक्के व्याजाने १८ वर्षांनी ही रक्कम दिली जाणार आहे. योजना चांगली असली, तरी या योजनेची ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत फारशी माहिती झाली नसल्याचे दिसून येते. सुमारे २० लाख लोकसंख्येच्या बीड जिल्ह्यात गेल्या ५ महिन्यांत केवळ ६ हजार ९२४ पालकांनी मुलींच्या नावे टपाल कार्यालयात खाते उघडून १ कोटी ७५ लाख रुपये गुंतवणूक केली. योजनेत अत्यल्प प्रमाणात पालकांनी सहभाग नोंदवल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागापर्यंत या योजनेचा फारसा प्रसार झाला नाही. टपाल कार्यालयातही या योजनेचा अर्ज मराठी भाषेत उपलब्ध नसल्याने भाषेचाही यात अभाव जाणवत आहे. परिणामी या योजनेकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. योजनेचा अधिक प्रसार व्हावा, या साठी कार्यालयांमार्फत प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती डाकघर अधीक्षक ए. के. धनवडे यांनी दिली.

Story img Loader