विकासाच्या दृष्टिकोनातून लहान राज्ये हितकारक नाहीत असा अनुभव आहे. लहान राज्यांमध्ये नक्षलवादासारखी समस्या लवकर मूळ धरू शकते. छत्तीसगढ व झारखंडमध्ये हे दिसून आले आहे, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला शुक्रवारी स्पष्टपणे विरोध दर्शविला. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची घाई झाल्याने त्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य विसरून पंतप्रधानांवर टीका केली, असा आरोपही चव्हाण यांनी केला.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी चिमूरमध्ये आयोजित केलेल्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा नक्षलवाद समस्येशी जोडला. आर्थिक तसेच विकासाच्या मुद्दय़ावर लहान राज्ये व्यवहार्य ठरू शकत नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत विदर्भवाद्यांची मागणी विचारात घेतली जाणार नाही, विदर्भाच्या विकासासाठी राज्यातील आघाडी सरकार कटिबद्ध असून आता केळकर समितीचा अहवाल आल्यानंतर विदर्भाच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राणे समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे तो अहवाल सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, या चर्चेत मला पडायचे नाही असे ते म्हणाले.
ते सेनेला कसे कळले?
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत झालेल्या नौदलाच्या पाणबुडीच्या अपघातात पाकिस्तानचा हात आहे, या शिवसेनेने केलेल्या आरोपावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. या प्रकरणाकडे आपण जातीने लक्ष देत आहोत. जे आम्हालाच कळले नाही ते शिवसेनेला कसे कळले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा