अलिबागमध्ये बिबटय़ांची कातडी जप्त करण्यात आल्याचे वृत्त १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सदरच्या वृत्ताविषयी महाड तालुक्यात सर्वत्र चर्चा केली जात आहे. आरोपी महाड तालुक्यातील नांदगावमधील आहे आणि तो अलिबाग बस स्थानकावर पोलिसांना सापडला, असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाड तालुक्यात जी चर्चा केली जात आहे ती पुढीलप्रमाणे- इंदापूरनजीक एका बोलेरो गाडीमध्ये कातडी व चार ते पाच जण पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. असे असताना अलिबाग बस स्थानकावर केव्हा कारवाई झाली, आरोपी केवळ एकच होता का आणखी होते, याबाबतची चर्चा महाड तालुक्यामध्ये केली जात आहे. वाघाच्या कातडीची पाळेमुळे महाड तालुक्यामध्ये असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. पोलिसांनी चुकीचा तपास केल्याचा संशय व्यक्त केला जात असल्यामुळे, वरील प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अलिबाग पोलिसांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या माहितीवरून आरोपी अलिबाग येथे १० ऑक्टोबर रोजी रात्री बस स्थानकावर आला होता असे म्हटले आहे. तो संशयास्पदरीत्या फिरत असताना पोलिसांनी त्याची झडती घेतली आणि दोन लाख रुपये किमतीची बिबटय़ा वाघाची कातडी जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर अलिबाग पोलिसांनी वन्य प्राणी अधिनियम १९७२ सुधारित अधिनियम २००३ चे कलम १.३१ (३), ४८ (अ) ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली असल्याचे समजते.
महाड तालुक्यात सर्वत्र जी चर्चा केली जात आहे, त्यामुळे तपासाबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. महाड परिसरात बिबटय़ा वाघाच्या कातडीची तस्करी मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे समजते. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्ताप्रमाणे महाड तालुक्यातील नांदगाव येथील तरुणाला अलिबाग बस स्थानकावर कातडीसह पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात वरील प्रकार हा अलिबागमध्ये झालेला नसून इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याचे समजते. १५ दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील नाते नांदगाव परिसरामध्ये दोन वाघांची शिकार करण्यात आली असल्याची चर्चा नाते पंचक्रोशीत केली जात होती. वन विभाग आणि पोलिसांनी या वृत्ताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. लोकांमध्ये होत असलेली चर्चा थांबल्यानंतर खर्डी नगरभुवन मार्गावर ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे त्या परिसरामध्ये वाघाची कातडी काढण्यात आली. मारण्यात आलेले वाघ त्याच परिसरामध्ये पुरण्यात आले. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला कातडी घेऊन जाणारी सिल्व्हर कलरची बोलेरो इंदापूरजवळ रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अडवली आणि आरोपीला वाहनासह ताब्यात घेतले. घटना इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असताना अलिबाग पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याची नोंद इंदापूर पोलिसांकडे का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. गुन्ह्य़ासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे काय झाले, वाहनामध्ये आणखी कोणी होते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने सदरच्या कारवाईबाबत महाड परिसरामध्ये पोलिसांच्या कारवाईबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाड तालुक्यामध्ये करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा