देवगड तालुक्यातील चांदोशी गडीताम्हणे हडीजवळ आठ वर्षांच्या बिबटय़ाची हत्या करून २२ वाघनखांची तस्करी केल्याप्रकरणी वनखाते चौकशी करीत आहे. या तस्करीत काही जणांचा समावेश असला, तरी संशयास्पद हालचालींवरून एक जण वनखात्याच्या टप्प्यात आला आहे. चारही पंजे छाटून नखांची तस्करी करण्याचा जिल्ह्य़ात पहिलाच प्रसंग असल्याचे सांगण्यात आले.
चांदोशी ता. देवगडमध्ये ३० जानेवारी रोजी एका बागेत बिबटय़ा चारही पंजे छाटलेल्या अवस्थेत मृत सापडला. त्याचे वैद्यकीय शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर विषप्रयोग करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या बिबटय़ाने शेतकऱ्यांना बराच त्रास दिला होता.
या पूर्ण वाढ झालेल्या सुमारे आठ वर्षीय बिबटय़ाचे चारही पंजे छाटून २२ वाघनखे नेण्यात आली. या वाघनखांना बाजारात मोठी किंमत आहे. त्यामुळे विषप्रयोग करून त्याला प्रथम मारण्यात आले. त्यानंतर वाघनखांसाठी पंजे छाटण्यात आल्याचा संशय वनसंरक्षक व संवर्धन विभागाचे सहायक वनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांनी व्यक्त केला.
याप्रकरणी वनखात्याने चौकशी सुरू केली आहे. वाघनखांची तस्करी करणारे वन किंवा पोलीस खात्याच्या जाळ्यात अडकतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. याप्रकरणी वनखाते सखोल चौकशी करत आहे.
बिबटय़ांना पकडण्यासाठी सापळा रचला जातो, पण आतापर्यंत नखांसाठी पंजे छाटण्याची घटना सिंधुदुर्गात घडली नव्हती, पण प्रथमच ही घटना घडल्याने वनखात्याने सर्व बाजूंनी चौकशी सुरू केल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांनी बोलताना सांगितले.
कणकवली वनक्षेत्र परीक्षेत्रातील अधिकारी चौकशी करत असून, आम्ही या चौकशीसाठी सहकार्य करत आहोत. लवकरच वाघनखे पळविणारे सापडतील असे बागेवाडी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा