भारतीय सैन्यदलाच्या ‘एनसीसी एन्ट्री’ अंतर्गत शॉर्ट सव्र्हिस कमिशनसाठी पुण्याच्या स्नेहा बाळकृष्ण सपकाळ हिची निवड झाली असून देशपातळीवरील गुणवत्ता यादीत तिने तिसरा क्रमांक पटकाविला.
देशभरातून एकूण ४८ युवतींची निवड झाली. त्यात ‘लेफ्टनंट’ पदासाठी केवळ ८ जागा असल्याने गुणवत्ता यादीतील पहिल्या आठ युवतींना ही संधी लाभणार आहे. चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ४९ आठवडय़ांचे हे सैनिकी प्रशिक्षण असेल. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर स्नेहासह आठ युवती ‘लेफ्टनंट’ बनतील आणि भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून कार्यरत होतील. पुण्यातील पिंपळे गुरव येथे वास्तव्यास असलेल्या स्नेहाचे शालेय शिक्षण गणेशखिंडच्या केंद्रीय विद्यालयात झाले. मॉडर्न महाविद्यालयातून बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केल्यावर तिने बीपीओमध्ये काही महिने काम करून संभाषण कौशल्य विकसित केले. महाराष्ट्र ‘एअर स्क्वॉड्रन’मधून तिने एनसीसीचे ‘सी’ प्रमाणपत्र मिळविले. स्नेहाचे वडील भारतीय सैन्यदलातून ‘नायक’ म्हणून निवृत्त झाले तर आई गृहिणी आहे. आपल्या यशाचे श्रेय स्नेहाने कुटुंबियांसह मार्गदर्शक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर या मार्गदर्शकांना दिले आहे. एनसीसीमध्ये असताना भारतीय सैन्यदलात करिअर करण्यास प्रोत्साहन मिळाल्याची भावना तिने व्यक्त केली.

Story img Loader