अलिबाग – महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप आज शिवसेना उध्दव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या मतदार संघात ठाकरे गट शक्तीप्रदर्शन करणार आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजता चांदे क्रिडांगणावर होणाऱ्या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आ सुभाष देसाई ,खा संजय राऊत , खा. अरविंद सावंत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधेरे , आ भास्कर जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी स्नेहल जगताप, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान जगताप यांच्या महाड मतदारसंघातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. महाडचे आमदार भरत गोगावले हे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर महाड मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची मोठी कोंडी झाली होती. मात्र स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे ही पोकळी भरून निघण्यास मदत होणार आहे. या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत आ भरत गोगावले यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत .
कॅांग्रेसने आम्हाला नेहमीच मान सन्मान दिला आहे , याबाबत आपली कोणतीही तक्रार वा नाराजी नाही.जो संघर्ष माणिक जगताप यांनी केला तसाच संघर्ष उद्धव ठाकरे करीत आहेत, तीच प्रेरणा घेत प्रवाहा विरोधात जात आपण उद्धव ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय आपण घेत असल्याचे स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याचे स्नेहल जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले . भविष्यात सर्व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी आपण सर्व सज्ज आहोत असेही स्नेहल जगताप यांनी सांगितले .
मुंबई , ठाण्यातील शिवसैनिक महाडमध्ये दाखल
दरम्यान या सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन शिवसेना ठाकरे गटाने केले आहे. मुंबई , ठाणे आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले महाड मतदार संघांतील ठाकरे गटाचे शिवसैनिक कालपासूनच आपल्या मुळ गावी दाखल झाले आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून , ठाकरे यांच्या स्वागतासाठी महाड शहरात सर्वत्र स्वागत कमानी व स्वागत फलक लावण्यात आलेले आहेत .