विश्वास पवार

महाबळेश्वरमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने वेण्णा लेक, लिंगमळा परिसरात हिमकण अनुभवायला येत आहेत. या वर्षीच्या थंडीच्या हंगामात दविबदूंचे हिमकण होण्याची ही चौथी वेळ आहे. तर सलग चार दिवस हिमकण आढळून आल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

महाबळेश्वरचे तापमान पाच अंश सेल्सिअसच्या खाली आले असल्याचे अनुभवास आले. मागील काही दिवसांपासून महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. महाबळेश्वरमध्ये वाहनांचे छत, झाडे-झुडपे गवतावर पडणारे हिमकण पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या वर्षी थंडीच्या हंगामात सलग दविबदूंचे हिमकण आढळून आल्याने पर्यटकांची संख्या वाढली आहे. महाबळेश्वरमध्ये नववर्षांच्या स्वागतासाठी व सलग सुट्टय़ांमुळे मोठी गर्दी होत असते. यंदाही तेच चित्र होते. त्यातच सध्या थंडीचा कडाका वाढल्याने पर्यटकांची गर्दी होत आहे. वेण्णा लेक नौकाविहाराच्या जेटीवर, लिंगमळा परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या टपांवर, छपरांवर झाडाझुडपांच्या पानांवर, गवतावर अनेक ठिकाणी हिमकण आढळून आले. स्ट्रॉबेरीच्या वेलीवर, हिरवळीवर हिमकण पाहायला मिळत आहेत. गेल्या वेळीपेक्षा यंदा थंडी जास्त असल्याचा अनुभव महाबळेश्वरमधील स्थानिकांचा आहे. महाबळेश्वरमध्ये हवामान मोजण्याची सुविधा आहे; परंतु ती अत्याधुनिक व्हायला हवी अशी त्यांची अपेक्षा आहे.

दविबदूंची निर्मिती अनियमित नाही. ही निर्मिती उत्तर भारतावर निर्माण झालेल्या थंड हवामानाच्या लाटांवर अवलंबून आहे. सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्यायाने महाराष्ट्राकडे अतिथंड वाऱ्यांमुळे महाबळेश्वरचे हवामान थंड होते. हवेतील बाष्प गोठते तेव्हा दविबदू होतात म्हणजे हिमकण होतात.

– डॉ. प्रकाश सावंत, भूगोलाचे अभ्यासक

Story img Loader