इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होतंय. युद्धामुळे मृतांची संख्या वाढत असून जागतिक नेत्यांनीही यामध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केलीय. दरम्यान, या युद्धामुळे जग दोन भगांमध्ये विभागला गेला आहे. काही देशांनी इस्रायला पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी पॅलेस्टाईन देशाची बाजू घेतली आहे. दरम्यान, भारतात मात्र केंद्र सरकारने इस्रायलच्या बाजूने भूमिका घेतली असली तरीही विरोधकांनी मात्र पॅलेस्टाईनची बाजू लावून धरली आहे. शरद पवारांनीही काल (१८ ऑक्टोबर) पॅलेस्टाईनची बाजू घेतल्याने भाजपातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय.
संजय राऊत म्हणाले की, “जगात काय चाललंय याची जाणीव लोकांना नाहीय. आसामचे मुख्यमंत्री एके काळी काँग्रेसचे सल्लागार होते. कोणाला हमासमध्ये पाठवयाचं आणि कोणाला अल कायदामध्ये हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाहीत. आधी देशाला वाचवा. अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका आधी समजून घ्या. विश्वगुरु नरेंद्र मोदींना बनवलं आहे, परंतु पंडित नेहरूंपासून इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयीपर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षात देशाची भूमिका राहिली आहे. सरकारे बदलली पण भूमिका बदलली नाही”, असंही ते म्हणाले.
हेही वाचा >> “मला वाटतं शरद पवार सुप्रिया सुळेंना हमासच्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी गाझाला पाठवतील”, भाजपा नेत्याचा टोला
“इव्हीएम मशिन टेम्पर करण्याची टेक्नॉलॉजी इस्रायलकडून मिळालं आहे. पेगासस तुम्हाला इस्रायलकडून मिळालं आहे, म्हणून तुम्ही इस्रायलच्या पाठीशी आहात”, असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, “अशा खूप साऱ्या गोष्टी इस्रायलकडून मिळाल्या आहेत. आम्ही इस्रायल विरोधात नाही. नाही पॅलेस्टाईनची बाजू घेत आहोत. या संघर्षाबाबत नेहरूंपासून अटल बिहारी वाजयेपींपर्यंत एक भूमिका आहे. त्या इतिहासाचा अभ्यास देवेंद्र फडणवीसांनी करावा.
“आसामचे मुख्यमंत्री वेडे झाले आहेत. त्यांच्याबाबत बोलणंही योग्य नाही. देश आणि इतिहासाला समजून घ्या. एके काळी काँग्रेसचं मीठ खाललं आहे हे त्यांनी (आसामच्या मुख्यमंत्र्यांनी) विसरू नका. ज्या पद्धतीने गाझावर हल्ला झाला आणि जो बायडेन तेल अवीवमध्ये बसून पाहत होते, ही कोणती मानवता आहे? असा प्रश्न विचारत त्यांनी जो बायडेन यांच्यावरही टीका केली.
हेही वाचा >> VIDEO : गाझा पट्टीतील रुग्णालय हल्ल्यावर वातावरण तापलं; इस्रायलनं शेअर केले प्रत्यक्ष घटनास्थळाचे ‘हे’ फोटो
“इस्रायलमध्ये ज्यापद्धतीने हमासच्या लोकांना मारलं आहे हे अत्यंत वेदनादायी आहे. कारगील युद्धानंतर काय झालंय हे आपण पाहिलं आहे. सामान्य जनता यामध्ये भरडली गेली होती. हमास आणि इस्रायलच्या युद्धातही सामान्य जनता मरत आहे आणि नेतेमंडळी बंकरमध्ये बसून भाषण करत आहेत. त्यामुळे देवेंद्रजी एकदा गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये जा आणि इतिहास समजून घ्या. अटल बिहारी वाजयेपी यांची संसदेतील भाषणे ऐका. ते दोनवेळा पंतप्रधान होते तेव्हा त्यांची पॅलेस्टाईनबाबतची भूमिका ती समजून घ्या, असंही म्हणाले.