भाईंदर : शनिवारी दुपारी तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली संशयास्पद बोट भाईंदरच्या उत्तन येथील मच्छिमारांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बोटीत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली होती. मात्र ही तपासात ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मासेमारीसाठी खोल समुद्रात गेल्याने या बोटीचा संपर्क तुटला होता.
मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून ४४ नौटीकल मैलावर शनिवारी दुपारी तटरक्षक दलाने एक बोट ताब्यात घेतली होती. या बोटीत पाकिस्थानी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. बोटीत पाकिस्तानी नागरिक असल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. मात्र अधिक तपासात ही बोट भाईंदरच्या उत्तन येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘जलराणी’ असे या मच्छिमार बोटीचे नाव असून ती उत्तनच्या बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वीच तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे
सध्या या बोटीत बोटीचे मालक, त्याचा मुलगा आणि १३ खलाशी आहेत.यातील ४ खालशी हे झारखंडचे तर उर्वरित ५ जण छत्तीसगडचे आहेत.सर्व खालश्याची आणि बोटीची कागदोपत्री माहिती तपासल्यानंतर त्यांना पुन्हा उत्तन येथे जाण्याच्या सूचना तटरक्षक दलाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रात्री आठच्या सुमारास ही बोट पुन्हा उत्तनला येईल, अशी माहिती संपर्कात असलेल्या उत्तनाच्या बोटीमारांकडून दिली जात आहे.