गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेत्या पंकजा मुंडे बऱ्याच चर्चेत आहेत. पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. जीएसटी विभागाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची सुमारे १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर, दुसरीकडे त्यांच्या शिवशक्ती परिक्रमा कार्यक्रमही चर्चेचा विषय ठरला आहे. पंकजा मंडे भाजपातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संघर्षकन्या म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे आता सहनशीलकन्या झाल्या आहेत, असं म्हटलं जातंय. यावरून पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
हेही वाचा >> “मी दररोज बँकांच्या पाया पडतेय”, आर्थिक तंगीबाबत पंकजा मुंडेंनी मांडली व्यथा
पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. त्यांना जाणीवपूर्वक साईडलाईन केलं जातंय, भाजपाच्या कार्यक्रमातही त्या फारशा दिसत नाहीत, असा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय. यावरून पंकजा मुंडे म्हणाल्या की, पक्षाने मला राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशचं प्रभारी पद दिलं आहे. माझ्या मंत्रालयाच्या बाहेर मी नाक खुपसत नाही. मी संघाच्या मुशीतून निघालेले भाजपाची कार्यकर्ता आहे. फक्त कार्यकर्ता नव्हे तर लोकनेता आहे हे सर्वांनी मान्य केलं आहे. मी पिंपरी चिंचवड आणि कसबा पोट निवडणुकीत होते, मराठवाड्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकांना मी होते. इतर ठिकाणी मला जबाबदारी दिली नव्हती तर मी कशी जाणार? असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंमध्ये एवढी सहनशीलता कधी आली आणि या सहनशीलतेचा अंत होणार आहे का? असा प्रश्न मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, लोकं म्हणतात की तुम्ही संघर्षकन्या आहात, किती सहन करणार? हे लोक म्हणतात की मी सहन करते, मी असं म्हटलेलं नाही. त्यामुळे, समोरचा माणूस प्रश्न विचारतो तेव्हा मी त्यांना म्हणते मी संघर्षकन्येसह सहनशीलकन्याही आहे. कारण, सहनशीलता हवीच. राजकारणातच नव्हे तर जीवनातही माणसात सहनशीलता हवीच. कोणतेही निर्णय घेतो तेव्हा मागे वळून पाहिल्यावर कळतं की तो निर्णय किती आवश्यक होता. माझ्यात खूप संयमता आणि सहनशीलता आहे. मी मंत्री होते, आमदार होते तेव्हा कोणत्याही क्षेत्रात अन्याय झाला तर मी उभे राहायचे. पण मी व्होकली कधीही असं बोललेले नाही.
ही सहनशीलता कुठून आली?
“मी २००९ मध्ये राजकारणात आले. आज आपण २०२४ च्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. २००९ ला मी निवडणूक लढले. माझा जन्मच वादळात झाला. मी राजकारणात आले. तेव्हापासून माझा संघर्ष मी पाहतेय. गोपिनाथ मुंडे तेव्हा खासदार होते. आमच्या जिल्ह्यात एकही भाजपाचा आमदार नव्हता. त्यामुळे आम्ही दोघांनी फार संघर्ष केला. तेथूनच माझ्यात सहनशीलता आली असावी किंवा माझ्यात सहनशीलता आहे म्हणूनच मी कोणत्याही आधाराशिवाय मी टिकले”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.