Sai Resort Case : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे. अनिल परब यांनी स्वतः आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली. “हरित लवादाकडे हे (साई रिसॉर्ट) प्रकरण सुनावणीस गेले असता त्यांनी हे प्रकरण डिसमिस केले आहे”, असं अनिल परब म्हणाले. तसंच, यावेळी त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरही संताप व्यक्त केला.
अनिल परब म्हणाले की, “दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी आमची चौकशी केली. गेले दीड वर्षे याप्रकरणात माझी नाहक बदनामी केली गेली. यासंदर्भात मी माझ्या बदनामीचा खटला हायकोर्टात दाखल केला आहे. मी सुरुवातीपासून सांगतोय की या प्रकरणात काही तथ्य नाही. किरीट सोमय्या त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करत आहेत. आरोप करून सोडून द्यायचे आणि मग अशी प्रकरणे अंगलट येताहेत असं दिसलं की ते मागे घ्यायचे. हरित लवादात हे प्रकरण सुनावणीला आलं तेव्हा या प्रकरणात काही तथ्य नाही. आम्ही हे प्रकरण डिसमिस करत आहोत असं जेव्हा न्यायमूर्तींनी सांगितलं तेव्हा आपली अब्रू जाईल या भितीने किरीट सोमय्या यांनी ही याचिका मागे घेतली आहे.”
हेही वाचा >> साई रिसॉर्टप्रकरणी ‘ईडी’कडून आरोपपत्र, अनिल परब यांचे नाव नाही?
“हायकोर्टात काही पिटिशन्स आहेत ते देखील अशाप्रकारे मागे घ्यावे लागतील किंवा डिसमिस होतील. ज्या गुन्ह्याच्या आधारावर हे कुंभाड रचलं गेलं की समुद्रात सांडपाणी जातं, ते रिसॉर्ट सुरूच झालं नाहीय तर त्याचं पाणी समुद्रात जाईल कसं, असा अहवाल शासनाने, प्रदुषण नियंत्रण मंडळाने, दिल्लीतील प्रदुषण मंडळाने, ईडीने दिला आहे. त्यामुळे हा गुन्हा सत्र न्यायालाने रद्दबादल केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी शासनाची फसवणूक केली आहे. हे गुन्हे रद्द झाल्यावर त्यांनी आणखी दोन गुन्हे रंगवले. हे गुन्हे हायकोर्टात रद्द करण्याकरता मी अर्ज केले आहेत. खोटे गुन्हे आम्ही सिद्ध करू. प्रत्येक ठिकाणाहून त्यांना याचिका मागे घ्याव्या लागत आहेत. किंवा या याचिकांमधून आम्हाला न्याय मिळेल”, असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून माफी मागावी लागेल, किंवा १०० कोटींचा दावा केलाय ते १०० कोटी द्यावे लागेल”, असंही अनिल परब म्हणाले.