“नारायण राणे किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिलेलं आहे. त्यांचा अस्वस्थपणा आता मंत्रिपद मिळाल्याने बाहेर निघालेला आहे. पूर्वी ते शिवसेनेत अस्वस्थ होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले तिथे अस्वस्थ झाले. आता त्यांना सूक्ष्म, लघु खातं मिळालेलं आहे, त्यामुळे त्याचं डोकंही सूक्ष्म झालेलं आहे.” अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलाताना केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले असून मातोश्रीवर विचारुनच त्यांना सर्व निर्णय घ्यावे लागतात, असा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेला आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री उरले आहेत असंही जन आशीर्वाद यात्रेनिमित्ताने वसईत आलेल्या नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
‘एकनाथ शिंदे केवळ सही करणारे मंत्री’
तसेच, “एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे चेले आहेत. ज्या आनंद दिघेंनी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा कायम फडकवत ठेवला, त्यांचे हे चेले आहेत. त्यामुळे हवामानाचा अंदाज ज्याप्रमाणे चुकीचा लागतो, ज्यावेळी सांगावं पाणी पडणार नाही, तेव्हा पाणी पडतं आणि ज्यावेळी सांगावं पाणी पडणार तेव्हा पाणी पडत नाही. तसा हा नारायण राणेंचा पोकळ अंदाज आहे.” असं देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी केली भूमिका स्पष्ट –
शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे . ‘मी कंटाळलो व लवकरच निर्णय घेणार’, हा ‘जावईशोध’ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहित असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.