प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण १२८ जणांना २०२२ सालासाठीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांच्यासहीत कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रामधील आणखीन एक महत्वाचं नाव या यादीमध्ये आहे ते म्हणजे करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे सायरस पूनावाला यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सध्या करोनाचा संसर्ग झाल्याने क्वारंटाइन असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केलाय. यावेळेस त्यांनी सायरस पूनावाला यांचा उल्लेख करताना एक खास शब्द वापरलाय.
नक्की वाचा >> वडीलांना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर बालपणीचा फोटो पोस्ट करत अदर पूनावालांची भावनिक पोस्ट, म्हणाले, “या वर्षी…”
भारतामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात आधी परवानगी मिळालेल्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष असणारे सायरस पूनावाला यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असणाऱ्या पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी एक खास ट्विट केलंय. “माझा बॅचमेट असणाऱ्या सायरस पूनावाला यांचा मला फार अभिमान वाटतोय. त्यांना औषध क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय,” असं शरद पवार म्हणालेत.
शरद पवार यांनी काल म्हणजेच २४ जानेवारी २०२२ रोजीच करोनाचा संसर्ग झाल्याचं ट्विटरवरुन सांगत आपण सध्या क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेत असल्याची माहिती दिली होती.
पूनावाला सहा दशकांहून अधिक काळ औषध निर्मिती क्षेत्रामध्ये
सायरस पूनावाला यांनी पुण्यातील हडपसर परिसरात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला यांनी लस निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकले. ‘सीरम’ ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.
‘सीरम इन्स्टिट्यूट’कडून सध्या पोलिओ, डायरीया, हेपिटायटस, स्वाईन फ्ल्यू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक लसी या ‘सीरम’मध्ये तयार केल्या जातात. ‘सीरम इन्स्टिट्यूट’ ही करोना प्रतिबंधक लस असणाऱ्या कोव्हिशिल्डच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहचली असली तरी मागील सहा दशकांहून अधिक काळापासून सायरस पूनावाला हे या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.