“मला अटक करणं ही देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी चूक होती हे आता त्यांना कळेल”, असं म्हणत संजय राऊतांनी जामिनावर तुरुंगातून बाहेर येताच सत्ताधाऱ्यांविरोधात टीकास्र सोडलं. संजय राऊतांना विनाकारण बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती, आसा निर्वाळा खुद्द पीएमएलए न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करताना दिला. त्यामुळे ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुणावल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पत्राचाळ घोटाळा आणि त्यासंदर्भात भूमिका मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. ईडीबाबत न्यायालयानं केलेली टिप्पणीही योग्यच असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
काय म्हटलं न्यायालयाने?
संजय राऊतांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने ईडीचे कान टोचले. “संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी वादासाठी अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांना तर कोणत्याही कारणाशिवाय अटक करण्यात आली आहे.या संपूर्ण प्रकरणात म्हाडाची भूमिका सुरुवातीपासून संशयास्पद राहिली आहे. ईडीनंही हे त्यांच्या तक्रारीत मान्य केलं आहे. मात्र, तरीदेखील म्हाडाच्या एकाही अधिकाऱ्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलेलं नाही. ठराविक लोकांनाच अटक करण्याची ईडीची वृत्तीच दिसून येते”, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला फटकारलं.
दरम्यान, न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर ईडीनं आता संजय राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी करत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा पत्राचाळ घोटाळ्यात सहभाग होता की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना अंजली दमानियांनी त्यासंदर्भात ट्वीट करून संजय राऊतांवर टीका केली आहे.
“संजय राऊतांना विनाकारण अटक”, न्यायालयाने टोचले ईडीचे कान; वाचा काय म्हटलंय आदेशात!
“ईडीचा सर्रास गैरवापर होतोय”
“ईडी निवडक लोकांना अटक करत आहे ह्यात काहीच शंका नाही. मुख्य आरोपींना अटक न करता, ईडीने मर्जीच्या आरोपींना अटक केली, ह्यातही शंका नाही. ईडीचा सर्रास गैरवापर होतोय. पण संजय राऊत आरोपी नाहीत, त्यांनी गैरव्यवहार केला नाही हे शक्य नाही”, असं आपल्या ट्वीटमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या जामिनाविरोधात ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर न्यायालयाकडून काय निर्णय दिला जातो, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.