सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये येणार आहेत. शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यायची होती. मात्र त्याआधीच पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

तृप्ती देसाईंनी गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची मागणी केली होती. आपल्याला शबरीमाला मंदिर प्रकरणी मोदींना भेटायचे आहे असे त्यांनी पत्रात म्हटले होते. आपल्या भेटू दिले नाही तर मोदींचा ताफा रोखण्याची धमकी त्यांनी दिली होती.

आम्ही शिर्डीला निघणार होतो. त्याआधीच पोलीस इथे पोहोचले. हे चुकीचे आहे. आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे. आम्हाला घरीच थांबवण्यात आले. मोदींकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असे तृप्ती देसाई म्हणाल्या.

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी खुले केले आहेत. पण त्यानंतरही मंदिरात जाण्यापासून महिलांना रोखण्याचा प्रयत्न होतं आहे. अयप्पाच्या भक्तांकडून काही महिलांना मारहाण करण्यात आली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी तृप्ती देसाईंना पंतप्रधान मोदींची भेट घ्यायची होती.

मोदी शिर्डीत येऊन सुरक्षितपणे साईबाबांचे दर्शन घेणार. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महिला शबरीमाला मंदिरात का जाऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विचारला. आम्हाला शबरीमाला मंदिरात जायचे आहे पण तुमचे तुकडे करुन महाराष्ट्रात पाठवू अशा धमक्या दिल्या जात आहेत. जे हिंसाचार पसरवणारे आहेत त्यांना भाजपा पाठिंबा देत असताना मोदी गप्प का आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला.

Story img Loader