लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील बारशेत येथील सुरेश लक्ष्मण खेराडे यांनी त्यांच्या मालकीची जागा गावाकीला दिली नाही म्हणून, त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर गावकीने दोन वर्षापासून सामाजिक बहिष्कार टाकला. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गावांच्या ग्रामस्थ कमिटीमधील ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश लक्ष्मण खेराडे रोहा तालुक्यातील बारशेत गावात कुटुंबासह राहतात. बारशेत गावठाणामध्ये त्यांचे स्वत:चे घर आहे. या गावात त्यांची कागदोपत्री मालकीची जमीन आहे. मात्र, गावातील लोक या जमिनीवर दावा सांगत आहेत. ही जमीन देण्यास सुरेश खराडे यांनी नकार दिला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बारशेत गावकीने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे.

सुमारे ८० वर्षांपूर्वी गावच्या खोताने गावकीची म्हणून विश्‍वासाने सुरेश खेराडे यांच्या आजोंबांच्या नावे जमीन केली होती. गावाने आपल्याशी बोलावं, आमच्याशी नीट राहावं म्हणून यापूर्वीच गावाच्या दबावात सुरेश यांनी १५ हून अधिक एकर जमीन गावाच्या नावावर केली आहे. अजूनही त्यांची १५ हून अधिक एकर जमीन नावावर करण्यास दबाव टाकला जात आहे. त्यास रमेश खेराडे यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे दोन वर्षापासून त्यांच्यावर व त्यांच्या कुटूंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला. गावाने त्यांच्या कुटूंबियांशी संबंध तोडले. गावातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास त्यांच्या कुटूंबियांना बंदी घालण्यात आली. त्यांच्यासोबत बोलणार्‍यांना ५० हजार रूपये दंड करण्याची धमकी देण्यात आली.

तसेच रमेश यांच्या मुलाचा केबल व इंटरनेटचा व्यवसाय आहे. त्याच्याकडून केबल व इंटरनेट कनेक्शन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. गावातील बचत गटातून सुरेश यांच्या पत्नीला काढून टाकण्यात आले आहे. गावगाड्याचे नियम समजून त्यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. परंतु मार्ग काढण्याऐवजी त्यांना विविध सण-समारंभांमधून वगळणं, त्यांच्या शेतावर कामाला न येणं, त्यांच्या कुटुंबातील कुणाही व्यक्तीशी न बोलणं, गावातील कुणी बोलल्यास त्याला बैठकीत बोलावून दरडावणं किंवा त्या व्यक्तीलाही बहिष्कृत करण्याची धमकी देणं इत्यादी प्रकार सुरू होते.

१५ मार्च २०२५ रोजी ग्रामस्थ मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेत गावाच्या विविध खर्चाचा हिशेब, कर्जाऊ घेतलेली रक्कम गोळा करणं, पुन्हा कर्ज देणं असा व्यवहार झाला. सुरेश यांनी या सभेत २५ हजार रूपये कर्ज मागितले ते देण्यास नकार देण्यात आला. गावकी ऐकतच नाही म्हणून सुरेश खराडे यांनी रोहा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

गावांच्या ग्रामस्थ कमिटीमधील नारायण तानाजी पवार, विजय वामन पवार, तनिल नारायण पवार, भगवान जानु पवार, सुधीर आंबाजी आगरे, भास्कर तुकाराम पवार, शांताराम महादेव खेराडे, प्रकाश वासुदेव कदम ,यांनी संगनमत करून बारशेत गावातील गावकर्‍यांना आमच्या कुटूंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्यास प्रवृत्त केले आहे . गावात वावरताना आमच्या कुटुंबीयांना भीती वाटते, एक प्रकारच्या दहशतीत आम्हाला जगावे लागते आहे. या प्रकरणाची दखल घेऊन, संबंधितांवर उचित कायदेशीर कारवाई करून, आम्हाला न्याय द्यावा, असे सुरेश खेराडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन रोहा पोलीस ठाण्यात नारायण तानाजी पवार, विजय वामन पवार, तनिल नारायण पवार, भगवान जानु पवार, सुधीर आंबाजी आगरे, भास्कर तुकाराम पवार, शांताराम महादेव खेराडे, प्रकाश वासुदेव कदम यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५१ (२) , १२६ (२) , ३ (५) व सामाजिक बहिष्कार अधिनियम २०१६ चे कलम ५ अन्वये २८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.