‘तुम्ही दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी दिली, तर आम्ही तुमचे मित्र, नाही दिले तर दुष्मनी चांगली नाही, असे सांगत नेवासे येथील खंडणीखोराने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राद्वारे पुन्हा धमकावले आहे. यासंदर्भात हजारे यांच्या कार्यालयातील स्वयंसेवकाने पारनेर पोलिसांत फिर्याद देऊनही पोलिसांकडून मात्र त्याबाबत माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे.
बुधवार, ९ मार्च रोजी हजारे यांच्या कार्यालयास निनावी पत्र प्राप्त झाले असून, त्यावर नेवासे पोस्टाचा शिक्का आहे. अंबादास चिमा लष्करे, पप्पू पवार, परांडे मिस्त्री, काळाराम पिटेकर यांची नावे लिहिण्यात येऊन हजारे यांचे वर्तमानपत्रातील छायाचित्र त्यावर चिकटविण्यात आले आहे. आमचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी तुम्हाला भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे, त्याचे हसू आले असे नमूद करून तुम्ही माजी सैनिक आहात, जर तुम्ही आम्हाला महिन्याला एक लाख रुपये दिले तर आम्ही तुमचे मित्र, एक लाख दिले नाही तर दुष्मनी चांगली नाही असा उल्लेख आखीव कागदावर लिहिण्यात आलेल्या या पत्रात करण्यात आला आहे. खाकी रंगाच्या पाकिटातून हे पत्र हजारे यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आले. यासंदर्भात शाम बाळासाहेब पठाडे या हजारे यांच्या स्वयंसेवकांनी पारनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी तक्रार दाखल केली. संबंधित पत्रही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांनी ही फिर्यादही दाखल केली आहे. यासंदर्भात शाम पठाडे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारचे पत्र आल्याने, ते पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्याकडे देऊन त्यासंदर्भात तक्रार दिल्याचे तसेच पोलिसांनीही १० मार्च रोजी गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा