सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ही पोस्ट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या संदर्भातली. रश्मी ठाकरे RTO कार्यालयात वाहनचालक परवान्यासंदर्भातल्या कामासाठी आल्याचा दावा या पोस्टमधून केला जात आहे. मात्र विषय एवढ्यात संपत नाही. ही पोस्ट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भातली असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या…
काय आहे व्हायरल होणारी पोस्ट?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या संदर्भात व्हायरल होणारी पोस्ट खालीलप्रमाणे –
“मुंबईच्या एका RTO कार्यालयात एक महिला चालत आली, तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नुतनीकरण करण्यासाठी.….त्या महिलेने नुतनीकरण फार्म घेतला तो व्यवस्थित भरला कागदपत्रे घेउन ती रांगेत उभी राहिली, हळुहळू क्रमांक पुढे सरकत होता, त्या महिलेची कागदपत्रे घेतली नुतनीकरण चलनाचे पैसै भरले. व सर्व प्रक्रिया आटोपून ती महीला RTO कार्यालया बाहेर पडणार तोच क्लार्क ने कागदपत्रे वाचली सौ. #रश्मीउद्धवठाकरे….तो आश्चर्यचकित झाला, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी इतक्या वेळ रांगेत उभ्या होत्या.मग काय पळापळ सुरु झाली. सर्व अधिकारी पळत आले, सौ. मुख्यमंत्राना विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावे. त्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण त्वरित करून देतो. सौ. मुख्यमंत्री यांनी गोड शब्दांत नकार दिला. मी फार्म भरला आहे, आणि नुतनीकरणाचे चलनही भरले आहे, आता तुमच्या नियमानुसार मला स्पीड पोस्टने परवाना पाठवा. गाडी सुरु करुन त्या निघूनदेखील गेल्या, एव्हाना अधिकाऱ्याचे कपाळ घामाने थबथबले होते. मुख्यमंत्र्यांची पत्नी अन् RTO कार्यालयात रांगेत उभी राहते यावर विश्वास बसत नव्हता!
ही पोस्ट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. तुमच्याही वाचनात ही पोस्ट आली असेल किंवा भविष्यात येईल. पण त्यासोबत आता आणखी एक पोस्ट व्हायरल होत आहे. ह्या दुसऱ्या पोस्टमध्ये वेगळं काहीच नाही. सगळाच्या सगळा मजकूर वरच्या पोस्टप्रमाणेच आहे. फक्त सौ. रश्मी उद्धव ठाकरे याऐवजी नाव आहे सौ. अमृता देवेंद्र फडणवीस. दोन्ही पोस्ट अगदी सारख्या, फरक फक्त नावाचा. या पोस्टच्या कमेंट्समध्ये अनेकांनी ही पोस्ट अमृता फडणवीसांच्या संदर्भात असल्याचं म्हटलं आहे.
वरच्या दोन्ही पोस्टमध्ये दोघींचीही नावं आहेत. मात्र फोटो कोणाचाच नाही. म्हणजे रश्मी ठाकरे काय किंवा अमृता फडणवीस काय…खरंच रांगेत कोण उभं राहिलं? दोघींपैकी खरंच कोणी रांगेत उभं राहिलं होतं का? याचा कोणताच पुरावा उपलब्ध नाही. या पोस्ट ज्या ज्या ठिकाणी दिसत आहे, तिथे कोणताही फोटो देण्यात आलेला नाही. त्यामुळे यातलं खरं काय आणि खोटं काय हे सांगणं भलतंच कठीण आहे.