दलित तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी वैचारिक व्यासपीठांचा वापर करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी आता अनेक दलित तरुणांनीच सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचा दाखला देत ही चळवळ कशी बोगस आहे, हे सांगणे सुरू केले आहे.
गेल्या ३० वर्षांपासून मध्य भारतात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आजवर आदिवासींच्या पाठिंब्याच्या बळावर देशासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शेकडो हिंसक कारवायांच्या माध्यमातून या देशातील भांडवलशाही नष्ट करण्याचे स्वप्न बघणाऱ्या या चळवळीला आता विस्ताराचे वेध लागले आहेत. शहरी भागात सक्रियता दर्शवण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या काही वर्षांपासून मागास वर्गातील तरुणांना जवळ करणे सुरू केले आहे. प्रामुख्याने दलित समाजातील सुशिक्षित तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी नक्षलवादी प्रयत्न करत आहेत. यासाठी नक्षलवाद्यांचे समर्थक म्हणून काम करणाऱ्या अनेक संघटनांनी आता वैचारिक व्यासपीठांना जवळ करणे सुरू केले आहे.
धुळ्यात येत्या १३ जानेवारीला होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनावरसुद्धा या संघटनांची नजर आहे. या संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याच्या तयारीत असलेल्या या संघटनांनी आता संमेलनात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना जाळय़ात ओढण्यासाठी सोशल नेटवर्कचा वापर करणे सुरू केले आहे. फेसबुक, ट्विटर, तसेच ब्लॉगच्या माध्यमातून नक्षलवाद्यांची विचारसरणी आंबेडकरांच्या धोरणाशी कशी जवळीक साधणारी आहे, याचा प्रचार सुरू झाला आहे. काही सुशिक्षित दलित तरुणांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी या प्रचाराचा प्रतिवाद करणे सुरू केले आहे. यासाठी या तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक भाषणांचा हवाला देणे सुरू केले आहे. २० नोव्हेंबर १९५६ ला आंबेडकरांनी नेपाळमधील काठमांडू येथे ‘बुद्ध व कार्ल मार्क्‍स’ या विषयावर दीर्घ भाषण केले होते. या भाषणात त्यांनी बुद्धाचा व डाव्यांचा मार्ग कसा वेगळा आहे, याचे सविस्तर विवेचन केले होते.
डाव्यांना अपेक्षित असलेला साम्यवाद व बुद्धाला अपेक्षित असलेली समानता आणि त्यासाठी निवडण्यात आलेले मार्ग, यावर आंबेडकरांनी यावेळी विस्तृत भाष्य केले होते. डाव्यांनी साम्यवादाच्या स्थापनेसाठी अनुसरलेला मार्ग अत्याचारी आहे. साम्यवाद रुजवण्यासाठी विरोधकांची हत्या करण्यासाठी सुद्धा डावे मागेपुढे बघणार नाहीत. बुद्धांना मात्र सनदशीर मार्गाने लोकांचे मन वळवणे हाच मार्ग अपेक्षित आहे. साम्यवादाची हिंसा बुद्धाला मान्य नाही. मालक वर्गाचा नायनाट केल्यानंतर निर्माण होणारी कामगारांची हुकूमशाही कशी राज्य करणार, हे सुद्धा डाव्यांना स्पष्ट करता आले नाही, असे मत आंबेडकरांनी या भाषणात मांडले होते. नेमका त्याचाच हवाला देत नक्षलवाद्यांच्या समर्थकांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न दलित तरुणांनी सध्या सुरू केला आहे. आंबेडकरांनी तयार केलेली देशाची घटना नक्षलवादी चळवळीला मान्य आहे काय, असा सवाल हे तरुण उपस्थित करत आहेत. त्याला उत्तर देताना नक्षलवाद्यांचे समर्थक व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करा, या घोषणेचा हवाला देत आहेत. विद्रोही साहित्य संमेलनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल नेटवर्कवर सुरू झालेल्या या चर्चेवर गुप्तचर व पोलीस यंत्रणासुद्धा लक्ष ठेवून आहे.

Story img Loader