सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी (१७ नोव्हेंबर) अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून सरकारला इशारा दिला होता. ‘ओबीसी’मधील ६० टक्के लोक भाजपाला मतदान करतात. त्यामुळे जर ‘ओबीसीं’च्या ताटातून काढून ते त्यांना (मराठा समुदाय) देणार असाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. या सभेतून भुजबळांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर अंजली दमानिया आज छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार होत्या. त्यासाठी त्या आपल्या कारने छगन भुजबळांच्या घराच्या दिशेनं जात होत्या. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना आडवलं आणि ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा- मोठी बातमी: आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात आणलं आहे. तत्पूर्वी, अंजली दमानिया यांना महिला पोलीस कर्मचारी ताब्यात घेत असताना त्यांनी पोलीस वाहनात बसण्यास नकार दिला. यावरून महिला पोलीस आणि दमानिया यांच्यात सौम्य झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा- “लाठीमार होताच मनोज जरांगे घरात जाऊन झोपले”; भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…
छगन भुजबळ यांच्याबाबत अंजली दमानिया या नेमका कसला खुलासा करणार होत्या? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. छगन भुजबळ यांच्या घरासमोर पत्रकार परिषद घेऊन मी सर्व खुलासा करणार आहे, अशी भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेला हा वाद आता छगन भुजबळ विरुद्ध अंजली दमानिया असा होताना दिसत आहे.