राज्यसरकारच्या स्थापनेनंतर जवळजवळ ४० दिवसानंतर मंत्रीमंडळ करण्यात आला. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही. याच मुद्द्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी टीका केली आहे.
हेही वाचा- संजय राठोडांच्या मंत्रीपदावरून मनिषा कायंदे यांचं चित्रा वाघ यांना आवाहन; म्हणाल्या…
शिंदे-फडणवीस सरकारची पुरुषी मानसिकता
आज राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, यामध्ये एकाही महिला मंत्र्याने शपथ घेतली नाही. मंत्रीमंडळात महिलांना स्थान न देणं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अपमान करण्यासारखं असल्याची टीका देसाई यांनी केली आहे. महाराष्ट्रात अजूनही एकही महिला मुख्यमंत्री बनली नाही. पुरुषी मानसिकता असलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा अपमान केला असल्याचा हल्लाबोल तृप्ती देसाईंनी केला आहे.
राठोडांच्या मंत्रीपदावरुन निशाणा
संजय राठोडांवर आरोप करणाऱ्या भाजपानेच आज त्यांना मंत्रीपद दिले. महाविकास आघाडी सरकारकडून भाजपाने राठोड यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले होते. असं असताना भाजपाने राठोडांना दिलेल्या मंत्रीपदावरुनही तृप्ती देसाईंनी निशाणा साधला आहे.