रायगड किल्ल्यावरील वीजबिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी या संपूर्ण प्रकरणातील गोंधळ संपलेला नाही. एकीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानउघाडणीनंतर पुरातत्व खात्याने किल्ल्याचे वीजबिल भरल्याचे दावे केले जात असताना, पनवेलमधील खांदा कॉलनी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने आपण वीजबिल भरल्याच्या पावत्याच सादर केल्या आहेत. त्यामुळे रायगडाचे वीजबिल नेमके कोणी भरले, हा प्रश्न आता विचारला जात आहे.
रायगड किल्ल्यावरील वीजपुरवठा महावितरणने बंद केल्याचे समजताच खांदा कॉलनी येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी सोमवारी महावितरण कंपनीकडून थकीत बिलाची माहिती घेऊन किल्यावर वापर झालेल्या विजेचे ३१ हजार ४४० रुपये विजबिल अदा केले. इंटरनेटद्वारे भरलेल्या या वीजबिलाच्या पावत्याही त्यांनी सादर केल्या आहेत. बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्याशी गवळी यांनी संपर्क साधला.
 मात्र  संबंधित किल्याचे विजमीटरचा ग्राहक क्रमांकाशिवाय आपण पुढील कारवाई करू शकत नाही, असे उत्तर मेहता यांनी आपल्याला दिल्याचे गवळी यांनी सांगितले. महाराष्ट्राचे गौरवस्थान आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या रायगड किल्ल्याबाबतच्या या अनास्थेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्याशी आपण संपर्क साधला व वीजपुरवठा खंडित होण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली, असेही ते म्हणाले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा