सोलापूर : भीमा खोऱ्यात अधुनमधून कमीजास्त पडणाऱ्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात मागील महिनाभरात १३ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. वजा पातळीवर तब्बल ६० टक्क्यांपर्यंत खालावलेल्या धरणात सध्या वजा ३७.७५ टक्के पाणीसाठा आहे. त्यात कासवगतीने का होईना, वाढ होऊ लागल्यामुळे धरणाच्या लाभक्षेत्रासह सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र भीमा खोऱ्यात पडणाऱ्या पावसात सातत्य नसल्यामुळे अजूनही धरण वधारण्याच्या अनुषंगाने सतत पावसाची गरज आहे. मात्र पावसाचा आशा-निराशेचा खेळ सुरूच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी सकाळी धरणात एकूण पाणीसाठा ४४.०४ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा वजा १९.६२ टीएमसी एवढा होता. मात्र भीमा खोऱ्यात पावसाने पुन्हा ओढ दिल्यामुळे दौंड येथून उजनी धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. काल मंगळवारपर्यंत दौंड येथून ७८४४ क्युसेक विसर्गाने धरणात पाणी मिसळत होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यात घट होऊन ६२७५ क्युसेक विसर्गाने धरणात पाणी मिसळत होते. सध्या दररोज सुमारे अर्धा टक्का पाणी वाढत असल्याचे दिसून येते. पुण्याच्या बंडगार्डनमधून अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. कारण तेथे पावसाचा जोर कमी आहे.

हेही वाचा – रायगडमधील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ, तेरा धरणे पूर्ण क्षमतेने भरली….

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दमदार पावसाचा फायदा उजनी धरणाला होऊन सुमारे आठ हजार क्युसेक विसर्गाने धरणात पाणी मिसळत होते. परंतु नंतर त्यात पाच हजार क्युसेकने घट होऊन साधारणतः अडीच हजार ते तीन हजार क्युसेक विसर्गाने धरणात हळूवारपणे पाणी मिसळत होते. दोन दिवसांपूर्वी धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सुमारे आठ हजार क्युसेकपर्यंत वाढला होता. त्यात पुन्हा घट होत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे आठवडाभर धरणातील पाणीसाठ्याची स्थिती जवळपास जैसे थे होती. नंतर पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठा हळूवारपणे वाढत असताना पुन्हा पावसाने दडी मारली आणि उजनी धरणात जमा होणारा पाणीसाठा पुन्हा मंदावल्याचे दिसून येते.
गेल्या ८ जूनपर्यंत धरणात पाणीसाठा वजा पातळीवर ५९.९९ टक्क्यांपर्यंत खालावला होता. त्यावेळी धरणातील एकूण पाणीसाठा केवळ ३१.५८ टीएमसीपर्यंत मर्यादित होता. ६३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा वजा पातळीत मानला जातो. धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी एवढी मोठी आहे.

हेही वाचा – Worli Hit and Run Case : मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत कोठडी; कोर्टात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद

सोलापूर जिल्ह्याच्या शेतीसह उद्योग आणि दैनंदिन पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण गतवर्षी जेमतेम पाऊसमान झाल्यामुळे केवळ ६०.६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. त्यात पुन्हा बेसुमार पाणी वाटप झाल्यामुळे पाणीसाठा झपाट्याने वजा पातळीवर गेला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur 13 tmc water storage has increased in ujani dam within a month ssb
Show comments