सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात शनिवारी दुपारी तीनपर्यंत संपलेल्या ३३ तासांत १८ टीएमसी पाणीसाठा वधारला. तर दुसरीकडे दुपारी भीमा खोऱ्यातील जवळपास सर्व धरणांचे दरवाजे बंद झाल्यामुळे तेथून दौंडमार्गे उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मंदावला आहे. दुपारी धरणात एकूण ८०.०६ टीएमसी पाणीसाठा होता. यात उपयुक्त पाणीसाठा १६.४० टीएमसी म्हणजे ३०.६२ टक्के इतका होता. दौंड येथून धरणात मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सकाळी ८७ हजार ७६४ क्युसेक होता. त्यात घट होऊन ४५ हजार २९७ क्युसेक झाला. त्यामुळे उजनीत पाणीसाठा वधारण्याचा वेग मंदावण्याची शक्यता दिसून येते.
गतवर्षी अत्यल्प पावसामुळे उजनी धरण ६०.६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. त्यानंतर नदी आणि कालव्यावाटे पाणी सोडताना नियोजनाचा बोजवारा उडाल्यामुळे धरणातील पाणीसाठा जानेवारीमध्ये हिवाळ्यातच वजा पातळीत गेला होता. त्यात उन्हाळ्यात दुष्काळाची भर पडली असताना धरणातून वारेमाप पाणी सोडले गेल्यामुळे गेल्या ७ जूनपर्यंत धरणातील पाणीसाठा वजा ५९.९९ टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. सुदैवाने मृग नक्षत्राच्या पावसाने भीमा खोऱ्यासह उजनी पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावली. त्यामुळे हळूहळू धरण भरण्यास सुरुवात झाली. अलिकडे आठवडाभर भीमा खोऱ्यात सह्याद्री घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे उजनीत झटपट पाणीसाठा वाढला. ८ जून ते शनिवारी २७ जुलैपर्यंत धरणात ५० दिवसांत ५० टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे दिसून आले.
हेही वाचा – सांगली: पावसाची उघडीप असली तरी पूराची धास्ती
काल शुक्रवारी सकाळी धरणात दौंड येथून एक लाख ८८ हजार क्युसेक एवढा उच्चांकी विसर्ग वाढला होता. नंतर सायंकाळी त्यात घट झाली. शनिवारी सकाळी ८७ हजार ७६४ क्युसेक विसर्ग सुरू होता. त्यानंतर दुपारी पुन्हा त्यात घट होऊन तो ४५ हजार २९७ क्युसेक वेगाने पाणी धरणात मिसळत होते. पुणे जिल्ह्यातील खडकवासलासह सर्व धरणांचे दरवाजे बंद झाल्यामुळे उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मंदावला आहे.