सोलापूर : परवानगीशिवाय चुकीचे वैद्यकीय उपचार करून रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोलापुरात एका डॉक्टरविरुद्ध अखेर दोन वर्षांनंतर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. नवीन सुभाष तोतला असे संबंधित डॉक्टरचे नाव आहे.
यासंदर्भात रहिमतबी हुसेनसाहेब केन्नीवाले (रा. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा जिलानी कन्नेवाले (वय १७) याने ऑगस्ट २०२२ मध्ये अॅसिड प्राशन केल्यामुळे अत्यावस्थ झाल्याने त्यास सोलापुरात न्यू ति-हेगाव, चांदणी चौकातील अग्रवाल नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. नवीन तोतला यांनी त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यास घरी पाठविण्यात आले होते. त्यानंतर १५ दिवसांनी, २३ ऑगस्ट २०२२ रोजी जिलानी यास नियमित वैद्यकीय तपासणीसाठी डॉ. तोतला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉ. नवीन तोतला यांनी रुग्णाला अपचनाचा त्रास होत असल्याचे जाणून घेऊन त्याच्यावर पुढील उपचारासाठी त्यास भुलीचे इंजेक्शन देऊन त्याच्या तोंडात नळी घातली. तेव्हा रुग्ण जिलानी हा शुद्धीवर होता आणि हालचाली करीत होता. त्यामुळे डॉ. तोतला यांनी पुन्हा दुसरे इंजेक्शन दिले. त्यानंतर काही क्षणातच रुग्ण बेशुद्ध पडला आणि त्याची प्रकृती बिघडली. तेव्हा डॉ. तोतला यांनी रुग्णाला बाहेर काढून आधार रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्याप्रमाणे आधार रुग्णालयात हलविले असता काही मिनिटांतच रुग्ण दगावला. यात डॉ. तोतला यांनी निष्काळजीपणा केला आणि रुग्णाच्या नातेवाईकांची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीने दोन इंजेक्शन देऊन रुग्णाच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरल्याची तक्रार मृत जिलानीच्या नातेवाईकांनी केली होती. त्याची चौकशी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शासकीय समितीने केली.
दोन वर्षे ही चौकशी चालली. यात डॉ. तोतला यांना दोषी ठरविणारा अहवाल समोर आला. त्यानुसार अखेर पोलिसांनी डॉ. तोतला यांच्याविरुद्ध रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.